Join us

Pik Nuksan : 'ती'च्या नशिबी पुन्हा वनवास; ढगफुटीने तीन लाखांचे पिक गेले पाण्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2025 14:47 IST

Dhagfuti Pik Nuksan गर्भगिरी डोंगररांगेतील सटवाई दरा, वाघदरा, काकडदरा भागात रविवारी व सोमवारी झालेल्या जोरदार पावसाने शिरेश्वर नदीला पूर आला.

चंद्रकांत गायकवाडतिसगाव : गर्भगिरी डोंगररांगेतील सटवाई दरा, वाघदरा, काकडदरा भागात रविवारी व सोमवारी झालेल्या जोरदार पावसाने शिरेश्वर नदीला पूर आला.

त्यात शिरापूर (ता. पाथर्डी) येथील कौठाच्या मळ्यातील मीनाक्षी हरिभाऊ बुधवंत यांच्या शेतीचे अतोनात नुकसान झाले. डाळिंब बाग, तुरीसह पशुधन चाऱ्याचे मका पीक अक्षरश मुळासकट उन्मळून पडले.

मीनाक्षी बुधवंत यांच्या पतीचे तीन वर्षापूर्वी दुर्धर आजाराने निधन झाले. औषधोपचार, दवाखान्यासाठी मोठा खर्च झाला. डोक्यावर कर्जाचा भार, एकुलता एक मुलगा अमोल व सुनबाई अक्षदा यांच्या मदतीने मीनाक्षी बुधवंत कशातरी सावरल्या.

पशुधनाचा चारा वाहून गेला. तुरीचे पीक भुईसपाट झाले. पुराचे पाणी घराच्या पायरीला लागले होते. आता हलक्या सरी पडू लागल्या, तरी काळजाचा ठोका चुकतोय.

मीनाक्षी बुधवंत रडवेल्या स्वरात बोलत होत्या. पावसाची एवढी दहशत या भागात बसलीय की काही दिवसांत पर्यायी जागा शोधून हे कुटुंब स्थलांतर होण्याच्या मानसिकतेत आहे.

सरकारी पंचनामे पाहणीसाठी इकडे कोणी फिरकलेही नसल्याचे वास्तव 'लोकमत' प्रतिनिधीने बुधवारी केलेल्या प्रत्यक्ष पाहणीत समोर आले.

महिला शेतकऱ्याचे डाळिंबाचे तीन लाखांचे नुकसान◼️ पदरी असलेल्या तीन एकरांपैकी एका एकरावर ३२० डाळिंब लागवड केली.◼️ मागील वर्षी पहिली, तर यावर्षी डाळिंबाची दुसरी तोडणी सुरू होती.◼️ चार दिवसांपूर्वी ३०० किलो डाळिंब विक्री केली. सव्वाशे ते दीडशे रुपये किलो दर मिळाला.◼️ अजून किमान १२५ बॉक्स डाळिंब निघाले असते, किमान अडीच ते तीन लाखांची अर्थप्राप्ती झाली असती, पण पावसाने क्षणात होत्याचे नव्हते झाले.

अधिक वाचा: कर्नाटक, आंध्रप्रदेशाच्या धर्तीवर महाराष्ट्रातही 'हे' केल्याशिवाय जमिनीच्या दस्ताची नोंदणी होणार नाही

टॅग्स :डाळिंबशेतकरीपूरपाऊसशेतीमहिलापीक