Phalabaga lagavada : पश्चिम वऱ्हाडातील शेतकऱ्यांनी कधीकाळी मोठ्या आशेने चिकू, डाळिंब, द्राक्षासारख्या फळबागा उभ्या केल्या होत्या. मात्र, वाढते तापमान, पाण्याचा तुटवडा आणि विमा व सल्ल्याचा अभाव यामुळे आता फळबागांचे क्षेत्र नावापुरतेच उरले असून शेतकरी पुन्हा पारंपरिक पिकांकडे वळले आहेत.(Phalabaga lagavada)
पश्चिम वऱ्हाडातील अकोला, वाशिम आणि बुलढाणा या जिल्ह्यांमध्ये काही वर्षांपूर्वी फळबागांचे क्षेत्र झपाट्याने वाढले होते. (Phalabaga lagavada)
चिकू, डाळिंब, द्राक्ष यांसारख्या पिकांकडे शेतकऱ्यांचा ओढा वाढला होता. मात्र वाढते तापमान, तीव्र पाणीटंचाई, किडी-रोगांचा वाढता प्रादुर्भाव, विमा संरक्षणाचा अभाव आणि कृषी खात्याकडून मिळणाऱ्या मार्गदर्शनातील मर्यादा यामुळे या पिकांचे व्यवस्थापन शेतकऱ्यांना परवडेनासे झाले आहे. (Phalabaga lagavada)
परिणामी, आज फळपिकांचे क्षेत्र केवळ नावापुरते उरले असून, शेतकरी पुन्हा पारंपरिक पिकांकडे वळले आहेत.(Phalabaga lagavada)
फळबागांतून पुन्हा पारंपरिक पिकांकडे वळण
वाशिमसह अकोला आणि बुलढाणा जिल्ह्यात अनेक शेतकऱ्यांनी फळपिकांच्या लागवडीत लाखो रुपयांची गुंतवणूक केली होती. प्रारंभी उत्पादन चांगले आले, दरही चांगले मिळाले. मात्र, हवामानातील बदल, दुष्काळी स्थिती, अवकाळी पाऊस, कीड व रोगांचा प्रादुर्भाव यामुळे उत्पादन घटले, फळांची गुणवत्ता कमी झाली.
या पिकांना नैसर्गिक आपत्तीमध्ये विम्याचे संरक्षणही उपलब्ध नसल्यामुळे नुकसान झेलणे कठीण झाले. त्यामुळेच अनेकांनी फळबागा तोडून पुन्हा कपाशी, सोयाबीन, तूर अशा पारंपरिक पिकांकडे वळण्याचा निर्णय घेतला.
वाशिममध्ये केवळ ३४५ हेक्टरवरच फळबागा
वाशिम जिल्ह्यात २०२४-२५ मध्ये भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेतून केवळ ३४५ हेक्टर क्षेत्रावर फळबाग लागवड झाली आहे. केवळ ३१५ शेतकऱ्यांनी या योजनेत सहभाग घेतला आहे. मागील दशकाच्या तुलनेत हे प्रमाण अत्यंत कमी आहे.
वाढते तापमान आणि पाण्याचा तुटवडा धोकादायक
गतवर्षीच्या तुलनेत वाशिमसह परिसरातील तापमान झपाट्याने वाढले आहे. उन्हाळ्यात पाण्याचा प्रचंड तुटवडा जाणवतो. पाणी आणि हवामान दोन्ही फळपिकांच्या अनुकूल नसल्यामुळे उत्पादनावर विपरीत परिणाम होतो.
फळपीक विकासासाठी धोरणांची गरज
शेतकऱ्यांनी फळपिकांकडे पुन्हा वळावे यासाठी या पिकांना विमा संरक्षण, हवामान सुसंगत जाती, सेंद्रिय पद्धतीने व्यवस्थापन आणि कृषी विभागाकडून सातत्याने मार्गदर्शन मिळण्याची गरज आहे. अन्यथा फळबाग क्षेत्र अधिकच घटत जाईल, अशी शेतकऱ्यांत चर्चा आहे.
वाशिमसह नजीकच्या जिल्ह्यांमध्ये तापमानात गेल्या काही वर्षांत वाढ झाली आहे. विशेषतः उन्हाळ्यात पाण्याचा तीव्र तुटवडा जाणवतो. या दोन्ही बाबी फळपिकांसाठी धोकादायक आहेत. त्यामुळे फळपीक लागवडीचे क्षेत्र कमी राहते. - आरीफ शाह, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, वाशिम.