मजुरांना त्यांच्या गावातच काम मिळावे, या अनुषंगाने ग्रामीण भागात रोजगार हमी योजना राबविण्यात येते. खरीप आणि रब्बीचा हंगाम संपल्यानंतर कामे शिल्लक नसतात.
त्यामुळे अनेकांना रोजगार हमी योजनेचा आधार मिळतोय. त्यामध्ये अनेक शिक्षित युवकांचा समावेश असून काही युवक उच्चशिक्षितांचाही समावेश दिसून येतो आहे.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून विविध वैयक्तिक आणि सार्वजनिक स्वरूपाची कामे सुरू करून मजुरांना गावातच काम उपलब्ध करून दिले जाते.
त्यामध्ये घरकुल बांधकाम, पाणंद रस्ता, फळबाग लागवड अशी कामेदेखील सुरू असल्याने मजुरांच्या हाताला काम मिळाले आहे. ग्रामीण भागात रोजगाराच्या फारशा संधी उपलब्ध नसल्याने पदवीधर, पदविकाधारक युवकही राबतात.
विदर्भाच्यावाशिम जिल्ह्यात रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून गावखेडयातील शिकलेले तरुणही मजूरी करीत असल्याचे चित्र दुर्गम भागात दिसून येत आहे.
काही गावांत स्थिती बिकट!
जिल्ह्यात नोकरी, उद्योगाच्या फारशा संधी उपलब्ध नसल्याने दुर्गम व डोंगराळ भागातील सुशिक्षित युवकांची स्थिती बिकट आहे. वाढते वय, घरची जबाबदारी आदी कारणांमुळे वेठबिगारी करण्याची वेळ गरीब कुटुंबातील युवकांवर येते.
'माझे डीएड झाले आहे. सध्या स्पर्धा परीक्षेची तयारी करतो. परंतु शिक्षणासाठी खर्च लागतो. त्यामुळे मजुरीच्या कामावरही जातो.' - अविनाश उचित, डीएड धारक युवक.
वाशिम जिल्ह्यातील तालुकानुसार जॉब कार्डधारकांची संख्या
कारंजा | ४७४७० |
मालेगाव | ५३१२३ |
मंगरुळपीर | ४३०२० |
मानोरा | ४६९६७ |
रिसोड | ५३५८५ |
वाशिम | ४९९२९ |
डिग्री मिळवली; नोकरी मिळणे अवघड
पदवीधर, पदविकाधारक व उच्च शिक्षण घेतलेल्या युवकांची मोठी संख्या जिल्ह्यात आहे. मात्र डिग्री घेऊनही उदरनिर्वाह करण्यासाठी मजुरीवर जावे लागत आहे.
खिशाला पेन; हातात घमेले!
जिल्ह्यात बेरोजगारीची मोठी समस्या आहे. त्यामुळे अनेक सुशिक्षित युवक मजुरीची कामे करतात. त्यांचे राहणीमान टापटीप असले तरी मजुरीला जावे लागत असल्याची स्थिती काही ठिकाणी दिसून येत आहे.
नोकरी नाही; लग्न जमेना!
शिक्षण घेतल्यानंतरही नोकरी न मिळाल्याने अनेक युवक मिळेल ते काम करतात. हल्ली वधूपक्षाच्या मंडळीच्या अपेक्षा प्रचंड वाढल्याने अनेकांचे लग्न जुळत नसल्याची स्थिती आहे.