Join us

हळद विक्रीचे पेमेंट मिळतेय चाळीस दिवसांनी; खरेदीदारांकडून मिळेनात शेतकरी बांधवांना वेळेवर पैसे

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2024 10:17 IST

हळदीचे पेमेंट मिळतेय चाळीस दिवसांनी

सध्या खरीप पेरणीचा हंगाम असल्याने शेतकरी विक्री केलेल्या शेतमालाचे पैसे मिळावेत, यासाठी अडत्याकडे चकरा मारत आहेत; परंतु हळदीची खरेदी करून सव्वा ते दीड महिना लोटूनही शेतकऱ्यांना पैसे मिळत नसल्याने आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो आहे.

शेतमालाची विक्री केल्यानंतर शेतकऱ्यांना आठ ते दहा दिवसांत त्याचे पेमेंट द्यावे लागते; परंतु एप्रिल, मे महिन्यात विक्री केलेल्या हळदीचे पैसे अजूनही मिळत नसल्याने पेरणीच्या हंगामातच शेतकरी अडचणीत सापडला आहे.

नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डात मोठ्या प्रमाणात यावर्षी सुरुवातीला हळदीची आवक झाली; पण आता शेतकरी पेरणीत गुंतल्याने आवक मंदावली आहे. पेरणी हंगाम तोंडावर आल्याने अनेक शेतकऱ्यांनी हळदीची साठवणूक न करता थेट विक्रीसाठी बाजारपेठ गाठली.

बाजार समिती यार्डात झालेल्या लिलाव बाजारात हळद विक्री केली. हळदीची विक्री करून अनेक दिवस झाले तरी मोजमापाला विलंब केला. त्यानंतर आठ ते दहा दिवसांत शेतकऱ्यांना शेतमालाचे पेमेंट देणे आवश्यक असताना महिना ते दीड महिना लोटूनही पैसे शेतकऱ्यांच्या हाती पडले नाहीत.

पेरणी हंगामात शाळाही झाल्या सुरू

सध्या पेरणी हंगाम सुरू असून, त्यात विद्यार्थ्यांसाठी शाळाही सुरु झाल्या ९ आहेत. विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके, गणवेश तसेच त्यांच्या शाळेची फी भरण्यासाठी पैशाची गरज आहे. शिवाय पेरणीसाठीही स्वत-बियाण्यांसाठी तजबीज करणे अशा परिस्थितीत विक्री केलेल्या शेतमालाची पट्टी वेळेवर मिळणे गरजेचे आहे; परंतु त्यासाठी व्यापाऱ्यांकडे चकरा माराव्या लागताहेत.

बाजार समितीच्या आदेशाला केराची टोपली

कृषी उत्पन्न बजार समितीमध्ये मागच्या महिन्यातच खरेदीदार, अडते यांची २ बैठक घेण्यात आली होती. त्यात खरेदी केलेल्या शेतमालाचे दोन ते तीन दिवसांत मोजमाप करून पेमेंट देण्याचे सूचित केले होते. तसे पत्रही बाजार समिती प्रशासनाने सर्व खरेदीदारांना दिले होते; परंतु बाजार समितीच्या आदेशालाही व्यापाऱ्यांनी केराची टोपली दाखवल्याचे चित्र आहे.

सोयाबीनच्या पेमेंटसाठीही थांबावे लागते १५ दिवस

सोयाबीनचे भाव साडेचार ३ हजारांवर असल्याने शेतकऱ्यांना यंदा उत्पादन खर्च वजा केला तर काहीच उरत नाही. असे असताना विक्री केलेल्या सोयाबीनचे पैसे देण्यासाठी खरेदीदार किमान १५ ते २० दिवस लावत आहेत. त्यामुळे आर्थिक चणचणीचा सामना करावा लागतो आहे.

हेही वाचा - खजुराचे पोषक तत्वे वाचून तुम्हीही म्हणाल; अबब अवघ्या एका खजुराचे किती हे गुणधर्म

टॅग्स :बाजारनांदेडनांदेडपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमार्केट यार्डमार्केट यार्डमराठवाडाशेतकरीसोयाबीनपीकशेती क्षेत्र