कोल्हापूर : महावितरणने ऑनलाइन वीजबिल भरणाऱ्या ग्राहकांचा टक्का वाढविण्याच्या हेतूने 'लकी डिजिटल' ग्राहक योजना सुरू केली आहे.
या योजनेसाठी ३१ मार्च २०२४ नंतर सलग तीन वेळा ऑनलाइन पद्धतीने वीजबिल भरणा करणारे सर्व लघुदाब वीज ग्राहक पात्र ठरणार आहेत.
१ जानेवारी ते ३१ मे २०२५ या कालावधीत सलग तीन वा तीनपेक्षा अधिक वीजबिले भरून योजनेच्या लाभाची संधी ग्राहकांना उपलब्ध करण्यात आली आहे.
ही योजना महावितरणच्या अशा लघुदाब चालू वीज ग्राहकांसाठी लागू असेल, ज्यांनी ०१ एप्रिल २०२४ पूर्वी मागील एक वर्ष म्हणजे ०१.०४.२०२३ ते ३१.०३.२०२४ या कालावधीत एकदाही वीज देयकाचा भरणा केलेला नाही किंवा ऑनलाइन वीज देयक भरणा पर्याय वापरलेला नाही.
राज्यात ७० टक्क्यांहून अधिक वीज ग्राहक ऑनलाइन पद्धतीने वीजबिलाचा भरणा करीत आहेत. हे प्रमाण वाढविण्यासाठी ग्राहकांना प्रोत्साहन देण्यासाठी योजना राबविण्यात येत आहे.
महावितरणच्या प्रत्येक उपविभाग स्तरावर एप्रिल, मे व जून २०२५ या प्रत्येक महिन्यात एक याप्रमाणे तीन लकी ड्रॉ ऑनलाइन पद्धतीने काढण्यात येतील. प्रत्येक लकी ड्रॉमध्ये पाच विजेत्यांना स्मार्ट फोन व स्मार्ट वॉच ही बक्षिसे दिली जाणार आहेत.
योजनेच्या कालावधीत ग्राहकाने ऑनलाइन वीजबिल भरणा पर्याय वापरून लकी ड्रॉ महिन्याच्या अगोदर दरमहा एकप्रमाणे सलग तीन किंवा तीनपेक्षा जास्त महिने वीजबिल भरणे आवश्यक राहील.
लकी ड्रॉ घोषित करण्यापूर्वीच्या महिन्याच्या अंतिम दिवशी ग्राहकाची थकबाकीची रक्कम रु.१० पेक्षा कमी असावी. एक ग्राहक केवळ एका बक्षिसासाठी पात्र असेल.