अशोक मोरे
अहिल्यानगर जिल्ह्याच्या पाथर्डी तालुक्यातील पश्चिम भागात पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. ज्या विहिरींना थोडे फार पाणी आहे, त्या विहिरींवर रात्रभर जागून महिला पाण्यासाठी नंबरला उभ्या असतात.
या भागातील पाणीटंचाई नागरिकांसाठी नित्याचीच बाब झाली आहे. अनेक ग्रामपंचायतींनी प्रशासनाकडे टँकरचा प्रस्ताव पाठवूनही अद्याप टैंकर मिळालेले नाहीत. त्यामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे. या भागातील संत्रा फळबागाही उन्हाच्या चटक्याने संकटात सापडल्या आहेत.
करंजी परिसरातील दगडवाडी, खांडगाव, वैजूबाभूळगाव, जोहारवाड़ी गावात तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे. या भागातील महिलांना दिवस दिवस पाण्यासाठी एक किलोमीटर भटकंती करावी लागत आहे. जोहारवाडी, दगडवाडी, खांडगाव ग्रामपंचायतीने टैंकरची मागणी करूनही अनेक दिवस उलटून गेले. मात्र अद्याप टैंकर उपलब्ध झाले नाही.
या भागातील काही गावांसाठी वरदान ठरलेली मिरी-तिसगाव प्रादेशिक योजनेचे पाणी रामभरोसे आहे. या योजनेचे पाणी आज येईल म्हणता म्हणता योजनेच्या लाईनची दुरुस्ती करण्यात आठ-आठ दिवस जात आहेत. एकंदर योजना अनेक आहेत, पण एकही कामाची राहिली नसल्याने नागरिकांना पाणी देता कोणी पाणी, असे म्हणत फिरण्याची वेळ आली आहे.
या भागात संत्रा, डाळिंब, मोसंबीच्या मोठ्या प्रमाणावर फळबागा आहेत. ज्यात टँकरने पाणी घेऊन जगविलेल्या फळबागा वाचतील की नाहीत? अशी भीती शेतकऱ्यांमधून व्यक्त केली जात आहे.
येत्या चार दिवसांत पिण्याच्या पाण्याचे टैंकर टंचाईग्रस्त गावांना मिळाले नाही तर आंदोलनाशिवाय पर्याय नाही, असा इशारा ओहारवाडी-खांडगावच्या उपसरपंच कविता सावंत, सरपंच शिवनारायण ससे, प्रकाश जगदाळे, संतोष चव्हाण, किरण ससे, महादेव चव्हाण, दगडवाडीचे सरपंच सुभाष शिंदे, वैजूबाभूळगावचे माजी उपसरपंच रावसाहेब लोहकरे, जोहारवाडीचे लाला सावंत, बंद्ध सावंत, प्रदीप कराळे, ग्रामपंचायत सदस्य दादासाहेब सावंत, मुक्ताबाई वांडेकर, तर दगडवाडीचे मारुती शिंदे, माणिक आबा, रंगनाथ आंधळे, अजिंक्य शिंदे, वैजूबाभूळगाव येथील आप्पासाहेब वांबेकर, गीताराम झाडे, सुनील भवार, संभाजी नरवडे आदींनी दिला आहे.
जोहारवाडी, दगडवाडी, खांडगाव येथे लवकरच पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरु करण्यात येतील. वैजूबाभूळगाव येथे एक टैंकर सध्या सुरू आहे. या भागातील पाणीटंचाई लक्षात घेऊन लवकरच टँकर उपलब्ध करुन दिले जातील. - शिवाजी कांबळे, गटविकास अधिकारी, पाथर्डी, जि. अहिल्यानगर.
पाथर्डीच्या पश्चिम भागात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. जोहारवाडी, खांडगाव परिसरातील वाड्या-वस्त्यांवर टैंकर सुरु होणे गरजेचे आहे. महिलांना होणारा त्रास एक महिलाच समजू शकते. टँकरचा प्रस्ताव दिलेला आहे, लवकरच टैंकर सुरु करावेत. - कविता सावंत, उपसरपंच, खांडगाव-जोहारवाडी.
.. तर आंदोलनाशिवाय पर्याय नाही.
पिण्याच्या पाण्याचे टैंकर टंचाईग्रस्त गावांना मिळाले नाही तर आंदोलनाशिवाय पर्याय नाही, असा इशारा ओहारवाडी-खांडगावच्या उपसरपंच कविता सावंत, सरपंच शिवनारायण ससे, प्रकाश जगदाळे, संतोष चव्हाण, किरण ससे, महादेव चव्हाण, दगडवाडीचे सरपंच सुभाष शिंदे, वैजूबाभूळगायचे माजी उपसरपंच रावसाहेब लोहकरे, जोहारवाडीचे लाला सावंत आदींनी दिला आहे.
हेही वाचा :शेतकरी बांधवांनो 'हे' सोपे उपाय येतील कामी; हृदयाविकाराची सुटेल चिंता सारी