Join us
Daily Top 2Weekly Top 5

कांदा उत्पादक शेतकऱ्यांना इकडे आड, तिकडे विहीर; कांदा ऐरणीत साठवून ठेवण्यालाच पसंती

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2026 14:03 IST

कांदा काढणीचा हंगाम तेजीत आहे. परंतु बाजारात कांद्याचे दर गडगडल्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.

खटाव : खटाव तालुक्यात कांदा काढणीचा हंगाम तेजीत आहे. परंतु बाजारात कांद्याचे दर गडगडल्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.

त्यामुळे कांदा कवडीमोल भावाने विकावा लागत आहे. कांदा आता शेतकऱ्यांला रडवू लागला आहे. शेतकरी हतबल व हवालदिल झाला आहे. कांद्याच्या दरात ५० टक्क्यांहून अधिक घट झाली आहे.

शेतकऱ्यांना ज्या ठिकाणी १५०० ते १८०० प्रतिक्विंटल दर मिळत होता. तेथे आता प्रतिक्विंटल तीनशे ते सातशे रुपये मिळत आहे. या कांद्याच्या मिळणाऱ्या दरात काढणी आणि वाहतुकीचा खर्चही भागवणे शक्य नाही.

त्यामुळे कांदा ऐरणीत ठेवण्याशिवय पर्यायच राहिला नाही. परंतु त्यातच कांदा हा नाशवंत असल्यामुळे वाढत्या उन्हामुळे ऐरणीतील कांदा सडण्याची भीती अधिक आहे.

त्यातच बहुतांश शेतकऱ्यांना आपला माल साठवून ठेवण्यासाठी व्यवस्था नसल्यामुळे पीक काढल्या काढल्या ते विकण्याशिवाय पर्याय नसल्याने शेतमाल कवडीमोल भावाने विकावा लागत आहे.

त्यामुळे त्यांच्या पदरी काहीच शिल्लक राहात नसल्यामुळे शेतकऱ्यांना फायदा कमी पण तोटा अधिक सहन करावा लागत आहे.

कांद्याचे मार्केट कमी आल्यामुळे व्यापारी देखील कांदा खरेदीसाठी फिरकत नसल्यामुळे शेतकऱ्यांना तोही प्रश्न भेडसावत आहे. त्यामुळे बहुतांश शेतकरी शिवारात किंवा घराशेजारी कांद्याच्या ऐरणी लावून दर वाढण्याची प्रतीक्षा करत आहेत.

कांदा साठवण्यासाठी शेतकऱ्यांना विशेष काळजी घ्यावी लागत आहे. वाढत्या उष्णतेमुळे कांद्याची गुणवत्ता टिकवण्यासाठी तसेच तो या हवामानामुळे खराब होणार नाही याकडे जातीने शेतकऱ्याला लक्ष द्यावे लागत आहे.

कांद्याला योग्य दर कधी मिळणार, याची प्रतीक्षा मात्र आता शेतकऱ्याला करावी लागत आहे. आखाती देशामध्ये सध्या सुरू असलेल्या युद्धाचा फटका दिवसेंदिवस ग्रामीण अर्थव्यवस्थेला बसताना दिसत आहे.

याचा परिणाम शेती व्यवसायावर होताना दिसून येत आहे. अनेक छोट्या मोठ्या ठिकाणाहून होणाऱ्या कांद्याच्या मागणीत जवळपास ५० ते ६० टक्क्यांनी घट झाली आहे.

कांदा हे पीक दराच्या बाबतीत बेभरवशाचे होत चालले आहे. या पिकातून फायद्याच्या ऐवजी तोटाच सहन करावा लागत आहे. त्यामुळे भविष्यात लाल कांद्याचे उत्पादन शेतकऱ्यांसाठी तोट्याचे ठरण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

इकडे आड, तिकडे विहीर◼️ कांदा हा नाशवंत असल्याने बऱ्याच शेतकऱ्यांनी भुई ऐरण लावल्या आहेत. परंतु कांद्याचे दर उतरत असल्यामुळे शेतकरी आधीच चिंतेत असतानाच त्याच्या समोर दूसरी समस्या उभी ठाकली आहे.◼️ वाढत्या उन्हामुळे ऐरणीतील कांदा खराब होण्याचे प्रमाण अधिक वाढले आहे. ज्या ठिकाणी मालाची अपेक्षा जास्त आहे तेथे निम्या देखील थैली भरत नसल्याने शेतकऱ्याचे आर्थिक भेटच कोलमडत आहे.◼️ एकीकडे कांद्याला दर नाही तर दुसरीकडे वातावरण कांद्याला पोषक नाही. त्यामुळे शेतकऱ्याची अवस्था 'इकडे आड, तिकडे विहीर' अशी झाली आहे.

शासनाचे शेती विषयक धोरणचा शेतमाल दरावर विपरीत परिणाम होत आहे. अनेक शेतकऱ्यांकडे कांदा साठवून घेण्यासाठी योग्य तसेच शस्त्रोक्त अशी यंत्रणा नसल्यामुळे या गोष्टीचा फायदा निश्चितच कांदा व्यापारी घेत आहेत. सध्याची कांद्याच्या दराची अवस्था पाहिली तर या मिळणाऱ्या दरातून कांदा उत्पादन खर्च देखील भागणार नसल्यामुळे शेतकऱ्याला आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. - बाळासाहेब जगदाळे, कांदा उत्पादक शेतकरी, खटाव

अधिक वाचा: एल-निनोचा प्रभाव तरीही राज्यात मान्सून वेळेवरच येणार; वाचा जेष्ठ हवामानतज्ञ डॉ.साबळे यांचा अंदाज

English
हिंदी सारांश
Web Title : Onion farmers face dual crisis: Low prices, storage challenges prevail.

Web Summary : Onion farmers in Khatav face hardship as prices plummet. Unable to cover costs, they store onions, risking spoilage due to heat. Many lack storage, forcing sales at meager prices. Farmers await better rates amid concerns about export demand and future losses.
टॅग्स :कांदाशेतकरीशेतीपीककाढणी पश्चात तंत्रज्ञानबाजारमार्केट यार्डसरकारकाढणी