यंदा कांद्याची लागवड उशिराने सुरू झाली असली तरी गतवर्षाच्या तुलनेत यंदा नाशिक जिल्ह्यात उन्हाळ कांद्याच्या लागवडीखालील क्षेत्रामध्ये घट झाली आहे. बागलाण तालुक्यामध्ये सर्वाधिक कांदा लागवड झाली असून सुरगाणा तालुक्यामध्ये सर्वात कमी लागवड क्षेत्र आहे.
नाशिक, त्र्यंबकेश्वर आणि पेठ या तीन तालुक्यांमध्ये डिसेंबर महिन्याच्या अखेरीस कांदा लागवडच झालेली नसल्याची नोंद झाली आहे. जानेवारी महिन्यातही अनेक ठिकाणी कांदा लागवड होणार असल्याने यंदा लागवडीखाली किती क्षेत्र राहील, याचा अंदाज आलेला नाही. नाशिक जिल्ह्याच्या अनेक भागातील शेतकरी आता कांदा पीक घेऊ लागले आहेत.
मात्र असे असूनही कांदा रोपांच्या टंचाईमुळे ३१ डिसेंबरपर्यत जिल्ह्यात ९८ हजार ५३९ हेक्टर क्षेत्रावर कांदा लागवड झाली आहे. मागील वर्षी १० जानेवारीपर्यंत नाशिक जिल्ह्यात एक लाख ८० हजार ८७७ हेक्टरवर लागवड झाली होती. अजूनही अनेक भागात कांदा लागवडी सुरू आहेत.
खराब हवामानाचा रोपांना फटका
यावर्षी उन्हाळी कांद्याच्या लागवड क्षेत्रामध्ये घट दिसत असून खर्चामध्ये वाढ झाली आहे. सुरुवातीला अति पावसाने रोपांची सड झाली होती, त्यानंतर टाकलेल्या रोपांवर सध्या कांदा लागवड सुरू आहे. मात्र यावर्षी मात्र रोगट हवामानामुळे कांदा उत्पादन किती निघेल हे वातावरणावर अवलंबून राहणार आहे.
सुरगाण्यात सर्वात कमी
• नाशिक जिल्ह्यात नाशिक, त्र्यंबकेश्वर, पेठ तालुके वगळता अन्य तालुक्यात उन्हाळ कांदा लागवड झालेली आहे. जानेवारी महिन्यात मोठ्या प्रमाणात लागवडीची शक्यता आहे.
• नाशिक जिल्ह्यात सर्वात जास्त लागवड बागलाण तालुक्यात २८ हजार २९० हेक्टरवर झालेली आहे. तर सर्वात कमी लागवड सुरगाणा तालुक्यात अवघी ७८ हेक्टरवर झालेली आहे.
तालुकानिहाय झालेली लागवड (हेक्टरमध्ये)
| तालुका | लागवड झालेले क्षेत्र (हे.) | तालुका | लागवड झालेले क्षेत्र (हे.) |
| सटाणा | २८२९० | चांदवड | १४३२० |
| देवळा | १२६३८ | मालेगाव | ११८०५ |
| येवला | ८६५८ | नांदगाव | ८४१५ |
| सिन्नर | ७२८३ | कळवण | ३४८० |
| निफाड | २७१९ | दिंडोरी | ७२० |
| इगतपुरी | १३० | सुरगाणा | ७८ |
| एकूण | ९८५३९ | - | - |
उशिराही पीक येऊ शकणार
कांदा लागवडी अजूनही मोठ्या प्रमाणात सुरू असल्याने जानेवारी शेवटपर्यंत कांदा लागवडी सुरू राहतील असे शेतकऱ्यांचे म्हणणे असून यावर्षी मात्र पाणी चांगले असल्याने अनेक भागात लेट कांदे सुद्धा चांगले येऊ शकतात, असे शेतकऱ्यांचे मत आहे.