कांद्याच्या उत्पादन आणि गुणवत्तेत लक्षणीय सुधारणा
कांद्याच्या उत्पादनाबाबत बोलायचे झाले तर, मल्चिंगमुळे कांद्याच्या गाठी अधिक भरदार, वजनदार आणि आकाराने एकसमान तयार होतात, ज्याचा थेट परिणाम पिकाच्या दर्जावर आणि बाजारभावावर दिसून येतो. मल्चिंगमुळे रोपे ताणमुक्त राहतात, वाढ जोमाने होते आणि दर्जेदार कांदे अधिक प्रमाणात मिळतात. त्यामुळे शेतकऱ्यांना A ग्रेड कांद्याचे उत्पादन जास्त मिळण्याची शक्यता वाढते आणि बाजारात उत्तम दर मिळतात.
सध्या बाजारात 4×4 इंच किंवा 5×5 इंच अंतराचे पूर्व-छिद्रीत मल्च सहज उपलब्ध आहेत. या मल्चमध्ये छिद्रे आधीच तयार असल्यामुळे रोपे लावणे अत्यंत सोपे होते आणि साध्या (छिद्र नसलेल्या) मल्चच्या तुलनेत लागवडीचा वेळ व श्रम दोन्ही मोठ्या प्रमाणात कमी होतात. अशा मल्चची सर्वात मोठी जमेची बाजू म्हणजे रोपांची संख्या आणि अंतर पूर्ण शेतभर एकसमान राखले जाते. त्यामुळे रोपांमधील अनावश्यक स्पर्धा टळते आणि प्रत्येक रोपाला पाणी, पोषणद्रव्ये व प्रकाश यांसारख्या संसाधनांचा संतुलित आणि योग्य पुरवठा मिळतो.
याशिवाय, पूर्व-छिद्रीत मल्चचा वापर केल्यास प्रति एकर 2.5 ते 2.75 लाख रोपे एकसमान अंतरावर ठेवणे शक्य होते, जे उच्च उत्पादन मिळवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरते. मल्चिंग केल्यावर मातीतील तापमान आणि ओलाव्याचे संतुलन राखले जाते, जे कांदा वाढीसाठी अत्यावश्यक आहे. रोपे उंच आणि मजबूत वाढतात, फुलकांड्यांची संख्या वाढते आणि पात्यांची वाढ अधिक सशक्त होते. गाठी भरण्याची प्रक्रिया अधिक प्रोत्साहित होते आणि गाठींची घनता, आकारमान व गुणवत्ता सुधारते. बीज उत्पादनातही मल्चिंगमुळे फुलकांड्यांची संख्या आणि त्यांची गुणवत्ता दोन्ही लक्षणीयरीत्या वाढतात, ज्याचा थेट फायदा शेतकऱ्यांना मिळतो.
पाण्याची बचत आणि खतांचा कार्यक्षम वापर = दुप्पट फायदा
मल्चिंगमुळे जमिनीतील ओलावा टिकून राहतो आणि सिंचनाच्या पाळ्या सहजपणे लांबवता येतात. बाष्पीभवन कमी झाल्यामुळे कमी पाण्यातही कांदा पिकाची वाढ जोमात राहते. विशेषतः पाण्याची उपलब्धता मर्यादित असलेल्या भागात मल्चिंग मोठा आधार देतो, कारण रोपे ओलाव्याच्या ताणाखाली येत नाहीत. कमी पाण्यात मिळणारे स्थिर उत्पादन शेतकऱ्यांच्या पाणी व्यवस्थापनाला अधिक सक्षम बनवते आणि शेती अधिक टिकाऊ करण्यास मदत करते.
मल्चिंगला जर फर्टीगेशनची जोड दिली तर त्याचा फायदा दुप्पटीने वाढतो. मल्चखालील माती सतत ओलसर राहिल्यामुळे मुळांची कार्यक्षमता वाढते आणि पोषकद्रव्यांचे शोषण अधिक प्रभावीपणे होते. समान प्रमाणातील खत दिले असतानाही मल्चिंग केलेल्या शेतात वाढ आणि उत्पादन दोन्ही उत्तम दिसतात. यावरून हे स्पष्ट होते की खतांचा प्रत्येक कण रोपांना अधिक उपयुक्त ठरतो आणि पोषणद्रव्यांचा अपव्यय मोठ्या प्रमाणात कमी होतो. मल्चमुळे तयार होणारे स्थिर, अनुकूल मृद्वातावरण खतांच्या परिणामकारकतेत भर घालते आणि अखेरीस उत्पादनातही लक्षणीय वाढ दिसून येते. मल्चिंग चा वापर केल्याने सरासरी २०-२५ % पाण्याचा वापर कमी होतो व खतांची हि तेवढीच बचत होते.
तणांचे नियंत्रण, श्रम आणि खर्चात मोठी बचत
मल्चिंग चा सर्वात मोठा फायदा हा तण व्यवस्थापनासाठी होतो. मल्चने माती झाकली जाते, त्यामुळे तणांना उगवण्यासाठी प्रकाश मिळत नाही आणि तणांचे प्रमाण नैसर्गिकरित्या घटते. मल्चिंगमुळे खुरपणी व तणनाशक फवारणीचा प्रति एकर कमीत कमी १५,००० ते २०,००० रुपयांचा खर्च वाचू शकतो. तणांची स्पर्धा नसल्यामुळे पोषणद्रव्ये, ओलावा आणि जागा पूर्णपणे कांद्यालाच उपलब्ध होतात, त्यामुळे पिकाची वाढ अधिक जोमदार होते आणि उत्पादनात स्थिरता येते.
तणनाशकांचा वापर कमी झाल्यामुळे जमिनीत रासायनिक अवशेष जाण्याची शक्यता कमी होते, ज्याचा थेट फायदा मातीतील उपयुक्त जिवाणू, गांडुळे आणि इतर सूक्ष्मजीवांना होतो. हे सूक्ष्मजीव मातीची सुपीकता, रचना आणि जैवविविधता टिकवून ठेवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असतात. तणनाशक न वापरल्यामुळे माती अधिक निरोगी राहते, सूक्ष्मजीवांची क्रियाशीलता वाढते आणि दीर्घकाळ टिकणारी मृदा-सुपीकता सुधारते. पर्यावरणाला अनुकूल असलेले हे तंत्र जगणाऱ्या मातीच्या संकल्पनेला पूरक ठरते आणि शेती अधिक शाश्वत बनवते.
रोग–किडींचा प्रादुर्भाव कमी होण्यास मदत
मल्च वापरल्यामुळे मातीचे शिंवट पानांवर उडत नाहीत आणि त्यामुळे बुरशीजन्य रोगांचे प्रमाण कमी राहते. स्थिर ओलावा मिळाल्यामुळे झाडांची प्रतिकारशक्ती वाढते, तसेच काही किडींना अनुकूल वातावरण न मिळाल्याने त्यांचा प्रादुर्भावही कमी होतो. यामुळे कांदा पिकात रोग-किडींचे व्यवस्थापन सुधारते, उत्पादन वाढते आणि साधारणतः १–२ रासायनिक फवारण्या वाचू शकतात, ज्यामुळे खर्च घटतो.
बम्पर ऐवररेज साठी मल्चिंग हा खात्रीशीर मार्ग
कांदा शेतीत मल्चिंग हे सुरक्षित, खर्च-बचत करणारे आणि उत्पादन वाढवणारे तंत्र आहे. अधिक उत्पादन, चांगला दर्जा, कमी पाणी, तण नियंत्रण, वाढीचा जोम, खतांचा उत्तम उपयोग आणि अधिक नफा, हे सर्व फायदे एकाच वेळी मल्चिंगमुळे साध्य होतात. त्यामुळे प्रत्येक कांदा उत्पादकाने आगामी हंगामात मल्चिंगचा अवलंब करणे हे शेती अधिक सक्षम, टिकाऊ आणि नफा वाढवणारे ठरेल.
- डॉ. संकेत मोरे, शास्त्रज्ञ (भाकृअनुप- कांदा आणि लसूण संशोधन संचालनालय, पुणे)
