Join us

प्रतिकूल हवामानाने बेदाणा उताऱ्यात एकरी दोनऐवजी एक ते दीड टन उत्पादन

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2024 5:33 PM

प्रतिकूल हवामान, पाणीटंचाई, अवकाळी पाऊस, दुष्काळी परिस्थिती यामुळे जत तालुक्यात बेदाणा उत्पादनात कमालीची घट झाली आहे. प्रतिएकरी एक टनाचा उतारा कमी झाला.

प्रतिकूल हवामान, पाणीटंचाई, अवकाळी पाऊस, दुष्काळी परिस्थिती यामुळे जत तालुक्यात बेदाणा उत्पादनात कमालीची घट झाली आहे. प्रतिएकरी एक टनाचा उतारा कमी झाला.

पाणीटंचाईमुळे द्राक्षे लवकर परिपक्व झाली. द्राक्ष लवकर शेडवर टाकावे लागले. बेदाण्यात मोठ्या प्रमाणात फोलपटे तयार झाली आहेत. त्यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे.

पाणीटंचाई असूनही जत पूर्व भागात द्राक्षबागांची संख्या अधिक आहेत. यावर्षी मान्सून पावसाने दडी दिल्याने १९७२ पेक्षा भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. शेत तलाव, कूपनलिका विहिरीतील उपलब्ध पाणीसाठ्यावर बागा आणल्या आहेत.

सप्टेंबर महिन्यात रिमझिम पाऊस, ढगाळ वातावरणामुळे दावण्या, भुरी या रोगांचा प्रार्दुभाव झाला. नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यापासून बागेला पाणी कमी पडले. टँकरने पाणी घालून बागा जगविल्या आहेत.

टँकरसाठी लाखो रुपये खर्च केले आहेत. खताची मात्रा दिल्यावर पाणी जास्त लागते. पाणी कमी पडल्याने फळ मोठे होण्यास, मण्यांचा आकार वाढविण्यास, मणी फुगण्यास अनुकूल स्थिती लाभली नाही.

फळ परिपक्व होताना पाणीटंचाई निर्माण झाली. त्यामुळे द्राक्ष घड आणि मणी लहान तयार झाले. द्राक्ष घडात साखर पाहिजे, त्या प्रमाणात आली नाही. २२ ब्रिक्स इतकी साखर होती. बेदाण्यासाठी साखर २४ ते २६ ब्रिक्स असावी लागते.

त्यामुळे दर्जेदार व गुणवत्तापर्ण बेदाणा तयार झाला नाही. परिणामी बेदाणा चपटा झाला. डागी बेदाणा तयार झाला आहे. साडेतीन ते चार किलो द्राक्षातून एक किलो बेदाणा तयार झाला. बेदाणाचा उतारा एकरी दोन टनाऐवजी एक ते दीड टन झाला.

येथे दर्जेदार व गुणवत्तापूर्ण बेदाणा तयार केला जातो. पूर्व भागातील उमदी, सिद्धनाथ, संख, बेळोंडगी, भिवर्गी, सुसलाद, बालगाव, हळ्ळी, मुचंडी, जालिहाळ खुर्द परिसरात बेदाणा उत्पादक शेतकरी आहेत. शेतकऱ्यांनी स्वतः बेदाणा शेड उभी केली आहेत.

सध्या बाजारात १७० ते १८० रुपये भाव आहे. द्राक्षावर पाण्यासाठी मोठा खर्च केलेला आहे. बँक, सोसायटी, सावकारांकडून काढलेल्या कर्जाची परतफेड कशी होणार हा प्रश्न आहे. 

कमी पाण्यामुळे बेदाणा उत्पादन कमी झाले. साखरेचे प्रमाण कमी झाल्याने बेदाणा चपटा झाला आहे. प्रतिएकरी उताराही कमी झाला. शासनाने कर्ज, वीजबिल माफ करण्याची गरज आहे. - विलास शिंदे, जालिहाळ खुर्द, बेदाणा उत्पादक बागायतदार

टॅग्स :द्राक्षेशेतकरीबाजारसांगलीजाटशेतीहवामानपाणी टंचाई