नितीन चौधरीपुणे : पंतप्रधान किसान सन्मान योजनेत देण्यात येणाऱ्या मानधनावरून केंद्र सरकार अधिकच कठोर होत आहे. यापूर्वी शेती नावावर असलेल्या शेतकऱ्याला ६ हजार रुपयांचा हप्ता दिला जात होता.
मात्र, आता कुटुंबातील पती आणि पत्नीच्या नावावर शेती असली तरी केवळ पत्नीलाच मानधन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शेतकरी पतीचे मानधन मात्र आता रोखून धरण्यात आले आहे.
राज्यातील अशा ६० हजारांहून अधिक शेतकऱ्यांना या निर्णयाचा फटका बसला असून त्यांना २० वा हप्ता देण्यात आलेला नसल्याचे उघड झाले आहे.
पीएम किसान योजनेत केंद्र सरकारने या योजनेचा २० वा हप्ता २ ऑगस्ट रोजी दिला. याचा लाभराज्यातील ९२ लाख ९१ हजार शेतकऱ्यांनी घेतला.
पीएम किसान योजनेच्या लाभासाठी लाभार्थ्याने भूमिअभिलेख नोंदणी अद्ययावत करणे, बँक खाते आधार संलग्न करणे, ई-केवायसी प्रमाणीकरण करणे या बाबी बंधनकारक केलेल्या आहेत.
तसेच योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्याच्या नावावर २०१९ पूर्वी जमीन खरेदी असणे आवश्यक आहे. एकाच कुटुंबातील पती, पत्नी, मुलगा, मुलगी लाभ घेत असतील तर आता एकालाच लाभ घेता येईल. इतर सदस्यांना त्याचा लाभ मिळणार नाही.
कुटुंबाच्या व्याख्येनुसार पती, पत्नी व त्यांच्या १८ वर्षाखालील मुलांसाठी हा हप्ता लागू आहे. मात्र, काही कुटुंबांनी पती व पत्नी या दोघांनीही नोंदणी केली असल्याने, अशा कुटुंबांमध्ये जर दोघांच्याही नाते जमीन असेल तर पतीचा हप्ता बंद केला आहे, तर पत्नीचा सुरू ठेवला आहे.
केंद्र सरकारच्या या नवीन नियमामुळे राज्यातील ६० हजार शेतकऱ्यांना फटका बसला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे.
योजनेचा २० वा हप्ता देण्यात आलेला नाही◼️ पंतप्रधान किसान सन्मान योजनेच्या अंतर्गत चुकीच्या निकषांमुळे पूर्वी शेतकऱ्यांना लाभमिळाला. नंतर मात्र या योजनेचा २० वा हप्ता शेतकऱ्यांना देण्यात आलेला नाही. मात्र, त्यांच्या पत्नीला हप्ता देण्यात आला आहे.◼️ राज्यातील अशा लाखभराहून अधिक कुटुंबाची पडताळणी करण्यात आली. त्यातून ही ६० हजारांची संख्या उघड झाली आहे.◼️ हा हप्ता रोखून धरला असला तरी केंद्र सरकारने याबाबत स्पष्ट निर्देश जारी केलेले नाहीत. त्यामुळे यानंतर तो हप्ता देण्यात येईल किंवा नाही.◼️ तसेच यापूर्वीच्या हप्त्यांची वसुली करण्यात येईल का, याबाबतही साशंकता असल्याचे कृषी विभागातील सूत्रांचे म्हणणे आहे.◼️ आता महाराष्ट्र राज्यातील ज्या शेतकऱ्यांचे मानधन रोखण्यात आले आहे, त्या शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.
अधिक वाचा: चवीला कडू पण आरोग्याला गोड, मेथीच्या दाण्यांचे 'हे' असंख्य फायदे; जाणून घ्या सविस्तर