वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी यांनी कृषि क्षेत्रात आणखी एक महत्वपूर्ण यश मिळविले आहे. नागरी विमान वाहतूक संचालनालय (DGCA) कडून विद्यापीठाला अधिकृत मान्यता प्राप्त झाली आहे.
आता विद्यापीठ ‘रिमोट पायलट ट्रेनिंग ऑर्गनायझेशन’ (RPTO) म्हणून देशातील अधिकृत ड्रोन प्रशिक्षण केंद्र म्हणून कार्यरत होणार आहे.
या मान्यतेमुळे विद्यापीठात आता शेतकरी, विद्यार्थी, कृषि अभियंते व संशोधकांना ड्रोन चालविण्याचे प्रशिक्षणासह ड्रोन पायलटचे अधिकृत लायसन्स प्राप्त करण्याची सुविधा होणार आहे.
महाराष्ट्र राज्यातील नागरी विमान वाहतूक संचालनालय मान्यताप्राप्त कृषि विद्यापीठांमध्ये वनामकृवि हे एक महत्वपूर्ण विद्यापीठ ठरले आहे, ज्यामुळे मराठवाडा विभागात कृषि तंत्रज्ञान क्षेत्रात मोठी झेप घेतली गेली आहे.
प्रशिक्षणाची रचना व वैशिष्ट्ये
◼️ वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या ‘रिमोट पायलट ट्रेनिंग ऑर्गनायझेशन’ (RPTO) येथे. नागरी विमान वाहतूक संचालनालय (DGCA) येथे DGCA ने ठरविलेल्या मानकांनुसार सहा दिवसांचे अधिकृत प्रशिक्षण दिले जाईल.
◼️ या प्रशिक्षणात पहिल्या १ ते २ दिवसात सैद्धांतिक (वर्ग) प्रशिक्षण, तिसऱ्या दिवसी सिम्युलेटर प्रशिक्षण तर पुढील ४ ते ६ दिवसी प्रत्यक्ष ड्रोन उड्डाण व हाताळणी असे प्रशिक्षणाचे टप्पे असतील.
◼️ प्रशिक्षणासाठी अत्याधुनिक सिम्युलेटर लॅब, प्रशिक्षित तज्ञ शिक्षक, सुरक्षित उड्डाण क्षेत्र, आणि कृषि फवारणीसाठी सुसज्ज ड्रोन उपकरणांची व्यवस्था करण्यात आली आहे.
◼️ सहभागींचे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांना नागरी विमान वाहतूक संचालनालयाच्या (DGCA) अधिकृत परवाना प्राप्त होईल.
‘दूरस्थ पायलट परवाना’ (Remote Pilot Licence) म्हणजे काय?
ज्या प्रमाणे मोटार वाहन चालविण्यासाठी वाहन परवाना आवश्यक असतो, तसेच ड्रोन चालविण्यासाठी ‘दूरस्थ पायलट परवाना’ आवश्यक असतो. हा परवाना फक्त DGCA मान्यताप्राप्त प्रशिक्षण संस्था (RPTO) मधून अधिकृत प्रशिक्षण पूर्ण केल्यावरच मिळतो.
प्रवेशासाठी पात्रता
◼️ उमेदवाराचे वय १८ ते ६५ वर्षे
◼️ शैक्षणिक पात्रता किमान १० वी उत्तीर्ण किंवा समकक्ष परीक्षा
◼️ वैद्यकीय प्रमाणपत्र आवश्यक
◼️ भारतीय ओळख पत्र असणे आवश्यक
शेतीपासून संरक्षण क्षेत्रापर्यंत नवे करिअर मार्ग
◼️ ड्रोन प्रशिक्षणाद्वारे कृषि, सर्वेक्षण व मॅपिंग, आपत्ती व्यवस्थापन, छायाचित्रण, सुरक्षा व पर्यावरण संरक्षण अशा विविध क्षेत्रांत रोजगार व उद्योजकतेच्या भरपूर संधी निर्माण होणार आहेत.
◼️ हे प्रशिक्षण विद्यार्थ्यांना, कृषि पदवीधरांना आणि शेतकऱ्यांना स्वावलंबन व आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रत्यक्ष अनुभव देणारे ठरेल.
संपर्क
डॉ. विशाल इंगळे
कृषि अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालय
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी - ४३११०२
vnmkv.rpto@gmail.com
मोबाईल क्रमांक - ९९००९३१२१४/९०९६९६७१४२
अधिक वाचा: सातबाऱ्यावरील अपाक शेरा म्हणजे काय? व तो कसा कमी करावा? वाचा सविस्तर