Join us

अद्यापपर्यंत एक रुपयाचीही मदत मिळाली नाही; खरिपातील नुकसानभरपाईची शेतकऱ्यांना प्रतीक्षा लागून

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2025 16:08 IST

Crop Insurance : कापणी होऊन शेतात असलेल्या पिकांना कोंब फुटून येणाऱ्या सरासरी उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाली होती. शासनस्तरावरून नुकसानग्रस्त क्षेत्रातील पिकांची पाहणी करून पंचनाम्याचे सोपस्कार पूर्ण करण्यात आले. मात्र, अद्यापपर्यंत शेतकरी वर्गाला एक रुपयाचीही मदत मिळाली नसल्याची तक्रार शेतकरी करीत आहेत.

नाशिक जिल्ह्याच्या बागलाण तालुक्यात ऑक्टोबर महिन्यात परतीच्या मुसळधार पावसाने थैमान घालत हजारो एकरातील खरीप हंगामातील मका, सोयाबीन, कांदा, कांदा रोपे यांचे नुकसान केले होते. उभी पिके पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते.

कापणी होऊन शेतात असलेल्या पिकांना कोंब फुटून येणाऱ्या सरासरी उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाली होती. शासनस्तरावरून नुकसानग्रस्त क्षेत्रातील पिकांची पाहणी करून पंचनाम्याचे सोपस्कार पूर्ण करण्यात आले. मात्र, अद्यापपर्यंत शेतकरी वर्गाला एक रुपयाचीही मदत मिळाली नसल्याची तक्रार शेतकरी करीत आहेत.

परतीच्या पावसाने येणाऱ्या सरासरी उत्पादनात घट निर्माण झाल्याने बळीराजाचे आर्थिक गणित बिघडले होते. यावेळी स्थानिक लोकप्रतिनिधींनी बळीराजाच्या बांधावर जात शेतकरी वर्गाला दिलासा देण्याचे काम केले होते. परंतु, नुकसान होऊन अनेक महिन्यांचा कालावधी लोटला असताना अद्याप एक रुपयाचीही मदत शेतकऱ्यांच्या खात्यावर आली नाही.

अनेक शेतकरी वर्गाने नुकसानाची माहिती पीकविमा कंपनीला कळवली असताना शासनाबरोबरच पीकविमा कंपनीनेही हात वर करत अद्याप मदत दिली नसल्याने बळीराजा हवालदिल झाला आहे.

खरीप हातचा गेल्याने या भागातील शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. शासनाने पीकविमा कंपनीला नुकसानग्रस्त क्षेत्रातील पिकांची पीकविमा रक्कम अदा करण्याच्या सूचना देत आर्थिक मदत त्वरित वितरित करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

ऑक्टोबर महिन्यात परतीच्या पावसाने खरीप हंगामातील काढणीला आलेल्या शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. शासनाकडून याचा पंचनामा करण्यात आला होता. याबाबत पीकविमा कंपनीला कळविले होते. पण, अद्याप एक रुपयाचीही मदत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेली नाही. त्वरित मदत मिळावी. ज्यामुळे शेतकऱ्यांना थोडाफार दिलासा मिळेल. - सुरेश संतोष बिरारी, कंधाणे.

हेही वाचा :  Onion Farming : राज्याच्या कांदा आगारात यंदा गत तीन वर्षांतील विक्रमी ६२ हजार हेक्टर लागवड

टॅग्स :पीक विमाखरीपशेती क्षेत्रनाशिकशेतकरीशेतीपाऊससरकार