Join us

कृषी विभागाचे दुर्लक्ष; मराठवाड्यातील ४ हजार ९०० हेक्टर मोसंबी फळबागा तग धरणार का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2024 19:40 IST

मराठवाड्याच्या (Marathwada) तब्बल ४ हजार ९०० हेक्टरवर मोसंबीचे क्षेत्र असून, गेल्या तीन-चार वर्षांपासून प्रत्येक हंगामात मोसंबी बागेतील फळगळीमुळे मोसंबी उत्पादक पुरते जेरीस आले आहेत. उसनवारी करून जीवापाड जपलेल्या मोसंबीच्या बागेच्या उत्पन्नातून आज ना उद्या चांगले दिवस येतील या भावनेने तालुक्यातील हजारो शेतकरी आजही आंबे बहरासाठी मोसंबी बागेची (Mosambi Bag) मशागत करत आहेत.

मराठवाड्याच्या जालना तालुक्यामध्ये तब्बल ४ हजार ९०० हेक्टरवर मोसंबीचे क्षेत्र असून, गेल्या तीन - चार वर्षांपासून प्रत्येक हंगामात मोसंबी बागेतील फळगळीमुळे मोसंबी उत्पादक पुरते जेरीस आले आहेत. उसनवारी करून जीवापाड जपलेल्या मोसंबीच्या बागेच्या उत्पन्नातून आज ना उद्या चांगले दिवस येतील या भावनेने तालुक्यातील हजारो शेतकरी आजही आंबे बहरासाठी मोसंबी बागेची मशागत करत आहेत.

गेल्या अनेक वर्षांपासून संकटात सापडलेल्या मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडून ठोस उपाय योजनांसंदर्भात अपेक्षा ठेवल्या होत्या. परंतु कृषी विभागाकडून कसलेही प्रयत्न केले जात नाहीत. यामुळे मोसंबीचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या या जिल्ह्यातील मोसंबीच्या बागा भविष्यात तग धरणार तरी कशा हा प्रश्न निर्माण झाला आहे.

दरवर्षी अडचणीत सापडून निराश झालेले बहुतांश मोसंबी उत्पादक शेतकरी मोसंबीच्या उभ्या बागा तोडून टाकत आहेत. ऐन मोसंबी तोडणी दरम्यान जुलै ऑगस्टमध्ये ढगाळ वातावरण व इतर कारणांमुळे ८० टक्के मोसंबीची फळगळ झाली. यामुळे मोसंबी उत्पादकांचा झालेला खर्चसुद्धा निघाला नाही. पदरमोड करून मोसंबी जगवायची आणि हताश व्हायची वेळ मोसंबी उत्पादकांवर येऊन ठेपली आहे.

कृषी विभागाकडून वेळेवर मार्गदर्शन मिळायला हवे

तालुका कृषी विभागाकडून आतापासूनच मोसंबी उत्पादकांना आंबे बहराच्या हंगामासाठी मार्गदर्शन होणे गरजेचे आहे. कृषी विभागामार्फत मोसंबी मशागतीपासून ते फळगळ थांबविण्यापर्यंत ठोस उपाययोजना संदर्भात वेळोवेळी मार्गदर्शन होणे गरजेचे आहे. मात्र याबद्दल कृषी विभागाकडून हवे तसे मार्गदर्शन मिळत नसल्याने मोसंबी उत्पादकांमध्ये नाराजी पसरत आहे.

आंतरमशागतीच्या कामांना वेग

निदान येणारा हंगाम तरी व्यवस्थित उत्पन्न देऊन जावा हीच अपेक्षा ठेवून मोठ्या संयमाने निराशा झटकून शेतकरी पुन्हा जोमाने मोसंबीच्या मशागतीला लागला आहेत. सध्या मोसंबीच्या बागेत मोगडा करणे, रोटावेटर यासह आंतर मशागतीची कामे सुरू आहेत.

मोसंबीची महागडी रोपे तसेच त्याचे चार-पाच वर्षे करावे लागणारे संगोपन आणि फळास आल्यानंतर निर्माण झालेल्या समस्या यावर योग्य त्या उपाययोजनांबद्दल वेळेवर मार्गदर्शन मिळत नाही. बदलत्या हवामानाने आणि निसर्गाचा लहरीपणा यामुळे शेतकरी संकटात सापडतो. यावर ठोस उपाययोजना होणे गरजेचे आहे. - कृष्णा क्षीरसागर, शेतकरी

हेही वाचा : Women Farmer Poultry Success Story : पारंपरिक शेतीला जोडधंदाची साथ; कुक्कुटपालनातून त्रिवेणा ताईंची आर्थिक अडचणींवर मात

टॅग्स :शेती क्षेत्रपीक व्यवस्थापनफलोत्पादनशेतीफळेशेतकरी