Join us

जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून मिळणार अनुदानावर कडबाकुट्टी, पेरणी यंत्र; हवंय मग 'येथे' करा अर्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2025 14:38 IST

शेतीसाठीच्या खर्चात दिवसेंदिवस मोठी वाढ होत आहे. बियाणं, खते, औषधं, मजुरी आणि यंत्रसामग्री यांचे दर वाढत चालले आहेत. परिणामी शेतीमधून होणाऱ्या उत्पन्नाची तुलना केली असता खर्चाचा ताळमेळ बसत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांवर आर्थिक ताण येतो आणि शेती परवडेनाशी वाटू लागते. अशा परिस्थितीत उत्पादन खर्च कमी करून उत्पन्न वाढवण्याचे पर्याय शोधणे अत्यंत आवश्यक झाले आहे.

शेतीसाठीच्या खर्चात दिवसेंदिवस मोठी वाढ होत आहे. बियाणं, खते, औषधं, मजुरी आणि यंत्रसामग्री यांचे दर वाढत चालले आहेत. परिणामी शेतीमधून होणाऱ्या उत्पन्नाची तुलना केली असता खर्चाचा ताळमेळ बसत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांवर आर्थिक ताण येतो आणि शेती परवडेनाशी वाटू लागते. अशा परिस्थितीत उत्पादन खर्च कमी करून उत्पन्न वाढवण्याचे पर्याय शोधणे अत्यंत आवश्यक झाले आहे.

याच पार्श्वभूमीवर लातूरजिल्हा परिषदेच्या सेस फंडातून कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना कडबाकुट्टी सयंत्र, रुंद सरी वरंबा पेरणी यंत्र तसेच स्लरी फिल्टर ही आधुनिक शेतीसाठी उपयुक्त यंत्रसामग्री अनुदानावर उपलब्ध करून देण्यात येत आहे. ही यंत्रे शेतकऱ्यांना उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी आणि वेळ, मजुरी व अन्य खर्चात बचत करण्यासाठी उपयुक्त ठरतील.

या यंत्रसामग्रीचे अनुदानावर लाभ घेण्यासाठी इच्छुक शेतकऱ्यांनी तात्काळ अर्ज करणे आवश्यक आहे. ही एक संधी असून, याचा लाभ घेतल्यास शेती अधिक फायदेशीर आणि आधुनिक पद्धतीने करता येईल. त्यामुळे शेतकऱ्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन वेळेत अर्ज करावा.

उत्पन्न वाढीसाठी...

शेतकऱ्यांच्या शेतीसाठीचा खर्च कमी व्हावा आणि उत्पन्नात वाढ व्हावी म्हणून जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाच्या वतीने सेस फंडातून अनुदानावर विविध कृषी अवजारे देण्यात येत आहेत. त्यामुळे इच्छुक शेतकऱ्यांनी १५ सप्टेंबरपर्यंत पंचायत समितीच्या कृषी विभागात अर्ज सादर करावेत, असे आवाहन लातूर जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी दीपक सुपेकर यांनी केले आहे.

विशेष आरक्षण...

योजनेच्या लाभासाठी महिला, अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांना आरक्षण राहणार आहे.

योजनेचे स्वरूप अन् अनुदान

• ३ एचपी कडबाकुट्टी - १४ हजार रुपयांपर्यंत अनुदान.

• ५ एचपी कडबाकुट्टी - १७ हजार रुपयांपर्यंत अनुदान.

• रुंद सरी वरंबा पेरणी यंत्र - ३२,५०० रुपयांपर्यंत अनुदान.

• स्लरी फिल्टर (टाकीसह) - २० हजारांपर्यंत अनुदान.

ही कागदपत्रे जोडा...

विहित नमुन्यातील अर्ज, ७/१२ आणि ८ अ उतारा, जातीचे प्रमाणपत्र, रुंद सरी वरंबा पेरणी यंत्रासाठी अर्जदाराच्या अथवा कुटुंबातील सदस्यांच्या नावावर ट्रॅक्टर असल्याचा पुरावा.

पंचायत समितीत अर्ज...

लाभासाठी जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर, पंचायत समितीत अर्ज उपलब्ध आहेत. ते भरुन जमा करावेत. अर्जाची छाननी करुन ज्येष्ठता यादी तयार करुन लाभार्थी निवडण्यात येईल. यंत्र खरेदीनंतर डीबीटीद्वारे अनुदान खात्यावर जमा होईल.

शेती उत्पन्न वाढीसाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे. अधिकाधिक शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे. - दीपक सुपेकर, जिल्हा कृषी विकास अधिकारी, लातूर.

हेही वाचा : करटुले शेतीतील कीड, रोग आणि त्यावरील उपाय; जाणून घ्या लागवडीचा अंतिम टप्पा सविस्तर 

टॅग्स :लातूरशेती क्षेत्रशेतकरीशेतीमराठवाडासरकारजिल्हा परिषद