नंदुरबार : जिल्ह्यात पूर्वी शहादा व नंदुरबारची सहकारी तत्चारील दूध डेअरी (Nandurbar Dairy) राज्यात प्रसिद्ध होत्या. या दोन्ही दूध डेअरीमधून परजिल्ह्यात दूध विक्रीसाठी जात होते. साधारणतः ३० वर्ष या दूध डेअरींचा दबदबा कायम होता. जिल्ह्यात दूध उत्पादनासाठी असलेली संधी पाहता पुन्हा दुग्ध विकास योजना राबविण्यात येणार आहे.
स्थानिक दूध उत्पादकांना त्या माध्यमातून चांगले आर्थिक उत्पन्न देखील मिळत होते. परंतु सहकार क्षेत्र ढासळणे, दुधाळ जनावरांची संख्या कमी होणे व इतर कारणांनी या दोन्ही डेअरी १९९८ ते २००५ या कालावधीत बंद पडल्या. दुग्ध विकास योजनेसाठी यासाठी राष्ट्रीय डेअरी विकास बोर्ड, गुजरातमधील प्रसिद्ध आनंद डेअरी यांच्या संयुक्त विद्यमातून आराखडा तयार केला जात आहे.
जिल्ह्यात दुग्ध विकास सहकारी संस्थांची संख्या २८ इतकी आहे. यात शहादा तालुक्यात सर्वाधिक ११, नंदुरबार तालुक्यात १०, तळोदा तालुक्यात ५ तर नवापूर तालुक्यात २ अशा आहेत. यातील सभासद संख्या तीन हजार ६४३ इतकी आहे. शहाद्यात पूर्वी एक दूध शीतगृह होते. जिल्ह्यालगत असलेल्या गुजरातमधील दोन डेअरी प्रसिद्ध असून तेथे जिल्ह्यातील दूध मोठ्या प्रमाणावर विक्री होते.
४८ गावांमध्ये १८ हजार कुटूंबांचे करणार सर्वेक्षण
जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) अंतर्गत नंदुरबार जिल्ह्यातील दुग्ध व्यवसाय विकासासाठी सर्वेक्षणास सुरुवात झाली आहे. या आराखड्यांतर्गत जिल्ह्यातील 3 सर्व सहा तालुक्यांतील ४८ गावे निवडण्यात आली आहेत. प्रती गाव एक संशोधक नियुक्त करून एकूण ४८ संशोधकांमार्फत १८ हजार २०० दुधाळ जनावरे पाळणाऱ्या कुटुंबांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे.