नाशिक जिल्ह्याच्या लासलगाव येथील रेल्वे स्थानकावरून रांचीला पाठविल्या जाणाऱ्या कांद्याची खासदार भास्कर भगरे यांनी रविवारी दुपारी अचानक तपासणी केली. हा निकृष्ट दर्जाचा कांदा पाठविला जात असल्याचे पाहून त्यांनी नाराजी व्यक्त केली.
असा कांदा पाठविण्याची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली. हा कांदा नाफेड किंवा एनसीसीएफचा असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र हा कांदा नेमका कुठला आहे या संदर्भात कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही.
खासदार भगरे यांनी रविवारी दुपारी अचानक लासलगाव रेल्वे स्थानकाला भेट दिली. त्यावेळी तेथे सुरू असलेल्या कांदा लोडिंग कामाची त्यांनी पाहणी केली. ज्यात रांची येथे पाठविण्यात येणाऱ्या कांद्याच्या गोण्या तपासताना खासदारांना निकृष्ट दर्जाचा कांदा लोड केला जात असल्याचे दिसून आले.
त्यामुळे येथील कामकाजाबद्दल त्यांनी शंका उपस्थित केल्या आहेत. शेतकरी आणि ग्राहक दोघांचाही विचार होणे गरजेचे असून निकृष्ट कांदा बाहेर पाठवला जात असेल तर ही शेतकऱ्यांची फसवणूक आणि ग्राहकांची दिशाभूल असल्याचे भगरे यांनी सांगितले. संबंधित शासकीय संस्थांकडून तत्काळ चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे.