तळेघर : उत्तर पुणे जिल्ह्यातील जुन्नर, आंबेगाव आणि खेड तालुक्यांमधील सह्याद्रीच्या पश्चिम आदिवासी पट्टयात एकेकाळी नाचणीचे आगर समजले जाणारे क्षेत्र आता नाचणी पिकापासून दूर जात आहे.
शेतकऱ्यांनी या पिकाकडे पाठ फिरवल्याने यंदाच्या खरीप हंगामात केवळ १० टक्के क्षेत्रावर म्हणजेच ३५० हेक्टरपैकी फक्त ३६ हेक्टरवर नाचणीची लागवड झाली आहे, अशी माहिती कृषी विभागाच्या आकडेवारीवरून समोर आली आहे.
पूर्वी या तालुक्यांमध्ये भाताबरोबरच नाचणी, सावा आणि वरई ही पिके घेतली जात होती. मात्र, सावा आणि वरई पिके शेतातून नामशेष झाली असून, आता नाचणीही त्याच मार्गावर आहे.
२०-२५ वर्षांपूर्वी आदिवासी पट्टयात भात लागवडीपूर्वी १५-२० दिवस नाचणी लागवड होत असे. त्यावेळी शेतकऱ्यांना टनामध्ये उत्पादन मिळत होते. नाचणी शेतकऱ्यांच्या जेवणाचा अविभाज्य भाग होती, परंतु गेल्या काही वर्षात या पिकाचे क्षेत्र झपाट्याने कमी होत आहे.
नाचणीच्या घटामागील कारणे◼️ कृषीभूषण शेती अभ्यासक राजेंद्र भट यांच्या मते, नाचणीला अपेक्षित दर मिळत नाही. शेतात काम करण्यासाठी मनुष्यबळाची कमतरता आणि शासनाकडून रेशनिंगवर मोफत धान्य वाटपामुळे शेतकऱ्यांनी नाचणीकडे पाठ फिरवली आहे.◼️ आदिवासी शेतकरी सिताराम कुडेकर म्हणाले, पूर्वी बारीक धान्याची पिके घेऊन कुटुंबाचा उदरनिर्वाह चालत असे. आता तरुण पिढी कष्टाची कामे टाळते, त्यामुळे सावा, वरई, नाचणी आणि खुरासणी शेतातून हद्दपार होत आहेत.
आव्हानेनाचणीला बाजारात योग्य दर मिळत नसल्याने आणि शेतीसाठी मजूर उपलब्ध होत नसल्याने शेतकरी इतर पर्याय शोधत आहेत. यामुळे नाचणीचे पिक नामशेष होण्याच्या मार्गावर आहे.
नाचणी रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवते◼️ नाचणी हे पूर्णान्न असून, त्यात फायबर, कॅल्शियम, लोह आणि अँटिऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात आहेत.◼️ यामुळे वजन नियंत्रण, हाडांचे आरोग्य, पचनशक्ती आणि रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत होते.◼️ लहान मुले आणि वृद्धांसाठी हे पीक विशेष फायदेशीर आहे. तरीही, आर्थिक आणि सामाजिक कारणांमुळे शेतकरी या पिकापासून दुरावत आहेत.
उपाययोजनांची गरजकृषी तज्ज्ञांच्या मते, नाचणीच्या लागवडीला प्रोत्साहन देण्यासाठी शासनाने योग्य दर हमी, मजुरांचा प्रश्न सोडवण्यासाठी यांत्रिकीकरण आणि जागरूकता मोहिमांवर भर देणे गरजेचे आहे. अन्यथा, हे पौष्टिक आणि पर्यावरणाशी जुळवून घेणारे पीक कायमचे लुप्त होण्याचा धोका आहे.
अधिक वाचा: मूळव्याध व पोटांच्या विकारांवर अत्यंत गुणकारी 'ही' रानभाजी तुम्हाला माहिती आहे का?