Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >शेतशिवार > सूर्य मागे ठेवून गेलेला माणूस

सूर्य मागे ठेवून गेलेला माणूस

Na Dho Mahanor The man who goes beyond sun | सूर्य मागे ठेवून गेलेला माणूस

सूर्य मागे ठेवून गेलेला माणूस

वहिनी गेल्यापासून दादांची जी अवस्था झाली ती सर्व आप्तेष्टांनी पाहिली आहे. “सुलोचनेच्या पारावर” या त्यांच्या अलिकडच्या पुस्तकात एक वाक्य ठळकपणे त्यांनी लिहिले आहे. “मी पण भेटण्याची तयारी करतोय” हे वाक्य स्व. वहिनींसाठी त्यांनी लिहून ठेवले होते. 

वहिनी गेल्यापासून दादांची जी अवस्था झाली ती सर्व आप्तेष्टांनी पाहिली आहे. “सुलोचनेच्या पारावर” या त्यांच्या अलिकडच्या पुस्तकात एक वाक्य ठळकपणे त्यांनी लिहिले आहे. “मी पण भेटण्याची तयारी करतोय” हे वाक्य स्व. वहिनींसाठी त्यांनी लिहून ठेवले होते. 

सिल्लोडच्या पुढे अजिंठा घाट उतरला की तसा खानदेश सुरू होतो. शेंदुर्णी, पळसखेड, वाकोद व पंचक्रोशीतील गावात सिल्लोड मराठवाड्याचा एक बाज दिसून येतो. खानदेशच्या या सीमेवर हजारो वर्षांपूर्वी पाषाणाला कोरणाऱ्या कलावंताचा सौंदर्य दृष्टिपासून ते  अहिराणी भाषेतील बहिणाबाईच्या मायेचा गोडवा देणाऱ्या शब्दांचे ना. धों. महानोर दादा खरे दूत होते. मध्यंतरीच्या काळात अर्थात 2008 नंतर बरोबर एक तप त्यांच्या सानिध्यात, सहवासात राहण्याची मला संधी मिळाली. या संधीचा मुख्‍य भाग होता तो जैन इरिगेशन, बहिणाबाई चौधरी मेमोरियल ट्रस्ट, गांधी रिसर्च फाउंडेशन आणि स्व. भवरलालजी जैन. 

दादांशी स्नेह आणखी घट्ट होण्याचे कारण म्हणजे, कविता शेतीसह पाणलोट आणि ग्रामविकासासाठी सुरू असलेली त्यांची धडपड. एकदा गंभीर होऊन त्यांनी पळसखेडमध्ये सुरू केलेल्या छोटेखानी ग्रंथालयाची सगळी कहाणी सांगितली. अंधाराच्या दारी उजेड पोहचविण्यासाठी जे काही शक्य होईल ते सारे प्रयोग प्रत्यक्षात करून सूर्याला नित नेमाने उगवा म्हणून हक्काने आर्जव करणारा हा महाकवी ! 

कविवर्य ना.धो. यांच्यासमवेत लेखक विनोद रापतवार
कविवर्य ना.धो. यांच्यासमवेत लेखक विनोद रापतवार

पळसखेडला त्यांच्या शेतातील निवासस्थानी त्यांची भेट म्हणजे दादांनी प्रत्येक झाडाला बोलते केले की काय इतपत अनुभूती यायची. लहानपणी खळखळून वाहणारी शेताच्या परिसरातील हे लहान-मोठे नाले, ओहोळ त्यांना पुन्हा जिवंत करायचे होते. वाहत्या पाण्याने नाल्यामध्ये सोडलेले शुष्क पदर व पांढऱ्या रेषा पाहून हा कवी पार व्याकूळ होऊन जायचा. विहीर खोदतांना कष्टाला आनंदाच्या गाठोड्यात ठेवणारा हा कवी एका झऱ्यावरही खूष होऊन जायचा. 

ओंजळीने भरु दे ग पाखरांच्या चोची  
दु:खात पंखांना असो सावली मायेची 

आबादानी होवो शेत भरु दे दाण्याचे 
तुझ्या पालखीला शब्द बांधू तुकोबाचे

विश्वाच्या मांगल्याचे हे दादाचे पसायदान. आपल्या वावरात तुकोबाला घेऊन हा कवी नाचला. शेतातल्या झाडांनाही दादांना तुकोबा पासून इतर कवींची नावे द्यावी वाटली. दादांना सदैव वहिनीची सोबत लागायची. वहिणीची भेट झाली नाही तर दादांची भेट झालीच नाही इथपर्यंत ते दोघांना पूरक होते.

दादांशी येणाऱ्या-जाणाऱ्यांचे बोलणे व्हायचे. वहिनी मात्र त्या चर्चेतल्या भावभावनांना आपल्या डोळ्यात साठवत. याचे सार त्या कासवाच्या माय सारखे दादांना पुन्हा वापस करतात की काय इथपर्यंत त्यांचा लळा आणि जीव होता. वहिनी गेल्यापासून दादांची जी अवस्था झाली ती सर्व आप्तेष्टांनी पाहिली आहे. “सुलोचनेच्या पारावर” या त्यांच्या अलिकडच्या पुस्तकात एक वाक्य ठळकपणे त्यांनी लिहिले आहे. “मी पण भेटण्याची तयारी करतोय” हे वाक्य स्व. वहिनींसाठी त्यांनी लिहून ठेवल्याचे सांगताना आज सकाळी श्रीकांत देशमुख पार गलबलून गेले. 

दादा म्हणजे अजिंठ्याच्या पंचक्रोशीत असलेले गुलमोहराचे झाड आहे. त्यांचे श्वास झाडा, फुला-पानापासून ते पार अजिंठ्याच्या लेण्यात सामावलेले आहेत. अजिंठा लेण्यासमवेत दादांना या लेण्या शोधून देणाऱ्या रॉबर्ड गिलवर लिहावे वाटले नसेल तर नवलच ! रॉबर्ड गिलने जीच्यावर प्रेम केले त्या पारोवर, त्यांच्यातील प्रेमावर जे काही दादांनी लिहिले आहे तो प्रत्येक शब्द वाचतांना जो भावार्थ मिळतो तो मांडता येणार नाही. दादा नावाचा पळस या पंचक्रोशीत दरवर्षी पून्हा-पून्हा बहरेल. तो नित नेमाने आपल्या भेटीला येत राहील.  भावपूर्ण आदरांजली !

- विनोद रापतवार, नांदेड  

Web Title: Na Dho Mahanor The man who goes beyond sun

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.