Join us

Mosambi Crop Management : मोसंबी बागेला ताण देण्याची घाई करू नका मोसंबी तज्ञ पाटील यांचे आवाहन

By रविंद्र जाधव | Updated: December 2, 2024 21:00 IST

KVK Gandheli : एमजीएम कृषी विज्ञान केंद्र गांधेली येथे शुक्रवार दिनांक २९ नोव्हेंबर २०२४ रोजी मोसंबी बागायतदार शेतकऱ्यांसाठी एकदिवशीय शेतकरी प्रशिक्षण व चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते.

मराठवाड्याच्या छत्रपती संभाजीनगर येथील एमजीएम कृषी विज्ञान केंद्र गांधेली येथे शुक्रवार दिनांक २९ नोव्हेंबर २०२४ रोजी मोसंबी बागायतदार शेतकऱ्यांसाठी एकदिवशीय शेतकरी प्रशिक्षण व चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते.

याप्रसंगी मोसंबी तज्ञ तथा निवृत्त सहयोगी अधिष्ठाता वनामकृवी परभणी डॉ. एम. बी. पाटील यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, मोसंबीचे झाड नैसर्गिकरित्या विश्रांतीत जाण्याकरिता थंडीचा कालावधी अतिशय महत्त्वाचा आहे. १४ डिग्री सेंटीग्रेड तापमानाने सतत २१ दिवस ठरल्यास बाग व्यवस्थित विश्रांतीत जातात.

त्यामुळे शेतकऱ्यांनी डिसेंबर महिन्यांत पूर्ण ताण बसेल अशा पद्धतीने नियोजन करावे. तसेच ज्यांच्या बागा उशिरा तुटल्या आहेत त्यांनी २० जानेवारीपर्यंत ताण देण्यास हरकत नाही. ताण देताना पाणी हळूहळू कमी करून ताण द्यावा. ताण कालावधीत झाडावरील काडी काढून १% बोर्डो मिश्रणाचा फवारा घ्यावा, तसेच खोडांना बोर्डोपेस्ट लावावी.

यासोबतच बागेचे आयुष्य वाढवण्यासाठी एकावेळी एकच बहार घ्यावा तसेच सेंद्रिय खतांचा जास्तीत जास्त वापर करावा. यामध्ये शेणखत प्रति झाड ५० किलो किंवा गांडूळ खत २५ किलो किंवा निंबोळी पेंड ८ किलो प्रति झाड प्रमाणे वापरावे. तसेच ताग, धैंच्या या सारख्या हिरवळीच्या खताचा वापर करावा.

ताण सोडताना सुद्धा हळूहळू ताण सोडावा. दर दिवशी पाण्याचे प्रमाण वाढवत जावे. जानेवारी-फेब्रुवारी महिन्यांपर्यंत ४० लिटर प्रती दिवस प्रमाणेच पाणी द्यावे. मात्र यापेक्षा अतिरिक्त पाणी देऊ नये, कारण मोसंबीचे झाड पाण्याला अतिशय संवेदनशील आहे. ताण सोडताना रासायनिक खत देत असताना शक्यतो ड्रीपच्या माध्यमातून विद्राव्य खतांचा वापर करावा.

याकरिता पहिल्या महिन्यात १९:१९:१९ हे विद्राव्य खत १०० झाडांसाठी ५ किलो प्रमाणे द्यावे. तसेच, सतत तीन महिने १९:१९:१९ या विद्राव्य खताची मात्रा द्यावी. फळधारणेनंतर मार्च महिन्यात होणारे नैसर्गिक गळ तसेच जुलै महिन्यात तापमानवाढीतील बदलामुळे होणाऱ्या गळीचे नियंत्रण करण्यासाठी विद्यापीठाच्या शिफारशीनुसार जीए-३ एक ग्रॅम, अधिक एक किलो ग्रॅम युरिया, ३०० ग्रॅम बोरिक ऍसिड १०० लिटर पाण्यात घालून १५ फेब्रुवारी ते १५ मार्च या कालावधीत फवारावे. याशिवाय, मार्च ते एप्रिल महिन्यात होणारी गळ थांबवण्यासाठी एक किलो पोटॅशियम नायट्रेट १०० लिटर पाण्यात घालून फवारणी करावी.

सद्य परिस्थितीमध्ये बऱ्याच भागांमध्ये नवीन पालवी दिसून येत आहे. अशावेळी घाबरून न जाता थंडीचा कालावधी असल्यामुळे ज्या ठिकाणी पालवीचे प्रमाण जास्त असेल अशा ठिकाणी १३:००:४५ किंवा लिओसीनचा फवारा शेतकऱ्यांनी शिफारशीनुसार घेऊ शकतात.

यासोबतच मोसंबीची नवीन लागवड करतांना चुनखडीचे प्रमाण जाणून घेणे महत्त्वाचे आहे. चुनखडीचे प्रमाण जास्त असल्यास मोसंबीची लागवड करू नये. त्यामुळे मोसंबी लागवड करण्यापूर्वी शेतातील मातीचे परीक्षण अवश्य करून घ्यावे. झाडांना सूर्यप्रकाशाची आवश्यकता असल्याने अति घन लागवड टाळावी. शिफारशीतील २० x १० फुट अंतराचा घन लागवडीसाठी वापर करावा.

या कार्यक्रमात सीटृस इस्टेट पैठणचे मुख्य कार्यकारी अधिकारी रामनाथ कार्ले उपस्थित होते ज्यांनी शेतकऱ्यांना सीटृस इस्टेट शेतकऱ्यांना भविष्यात काय सुविधा पुरविणार आहेत याबद्दल माहिती दिली. तर अध्यक्षीय भाषणामध्ये एमजीएम गांधेलीचे संचालक डॉ. के. ए. धापके यांनी आवाहन केले की केव्हीकेच्या सुविधांचा शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा.

तसेच केव्हीकेचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख काकासाहेब सुकासे यांनी केव्हीकेमध्ये उपलब्ध जैविक निविष्ठाबद्दल माहिती दिली. तर सदर कार्यक्रमास पैठण, गंगापूर, संभाजीनगर तालुक्यातील शेतकरी उपस्थित होते.

हेही वाचा - Organic Farming : गांडूळ खत निर्मितीतून शेतकऱ्याने फुलविली सेंद्रीय शेती; उत्पन्नाच्या देखील रुंदावल्या सीमा

टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीशेतीपीक व्यवस्थापनफलोत्पादनमराठवाडाकीड व रोग नियंत्रण