जगभरात फैलावत असलेल्या 'मंकीपॉक्स' (एमपॉक्स) या संसर्गजन्य आजाराचा राज्यातील पहिला रुग्ण धुळ्यात आढळून आला आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे.
हा आजार प्राण्यांपासून माणसांमध्ये पसरणारा असून, त्याची लक्षणे देवीसारखी आहेत. योग्य प्रतिबंध आणि विलगीकरण उपायांनी संसर्गावर नियंत्रण मिळवता येते.
माकडतापापेक्षा पूर्णपणे वेगळ्या प्रकारचा आजार
'मंकीपॉक्स' आणि 'माकडताप' हे दोन पूर्णपणे भिन्न आजार आहेत. माकडताप हा फ्लॅव्ही व्हायरस गटातील किड्यांमुळे होतो, तर मंकीपॉक्स हा ऑर्थोपॉक्स व्हायरसमुळे होतो.
कशामुळे होतो मंकीपॉक्स?
◼️ मंकीपॉक्स हा ऑर्थोपॉक्स व्हायरस समूहातील विषाणूमुळे होणारा संसर्गजन्य आजार आहे.
◼️ हा विषाणू मुख्यतः माकडे, उंदीर, खारी, आणि इतर वन्य प्राण्यांमध्ये आढळतो.
◼️ संक्रमित प्राण्यांशी थेट संपर्क आल्यास, त्यांचे रक्त, शारीरिक स्त्राव किंवा जखमा स्पर्शल्यास हा विषाणू माणसात प्रवेश करतो.
◼️ काही प्रकरणांमध्ये माणसाकडून माणसातही हा संसर्ग होऊ शकतो.
मंकीपॉक्सची लक्षणे काय?
◼️ सुरुवातीला ताप, अंगदुखी, डोकेदुखी, थकवा आणि सूज आलेले लिम्फ नोड्स दिसतात.
◼️ काही दिवसांत चेहरा, तोंड, हात, पाय, आणि शरीरावर पुरळ उठतात.
◼️ या पुरळांमध्ये द्रव भरतो आणि नंतर खपल्यांमध्ये रूपांतर होते.
◼️ त्वचेवरील जखमा काही आठवड्यांत बऱ्या होतात.
संसर्ग कसा पसरतो?
◼️ संक्रमित व्यक्तीच्या त्वचेवरील जखमा, पुरळ किंवा शरीरातील द्रवांच्या संपर्कातून.
◼️ संक्रमित प्राण्यांशी थेट संपर्क आल्यास किंवा त्यांच्या मांसाच्या सेवनातून
◼️ संसर्गित व्यक्तीच्या कपड्यांद्वारे, बेडशीट, किंवा वस्तूंमधून.
◼️ काही प्रकरणांमध्ये दीर्घकाळ जवळ राहिल्यास श्वसनाद्वारेही संसर्ग होऊ शकतो.
विलगीकरण आवश्यक
मंकीपॉक्सचा संशयित रुग्ण किमान २१ दिवस विलगीकरणात ठेवावा लागतो. रुग्णाशी संपर्क येणाऱ्यांनी हात नीट धुवावेत आणि मास्क, ग्लोव्हज वापरावेत. रुग्णाने इतर व्यक्तींशी थेट संपर्क टाळावा.
काय काळजी घ्याल?
◼️ वन्यप्राणी, विशेषतः माकडे, उंदीर यांच्याशी थेट संपर्क टाळा.
◼️ आजारी व्यक्तीच्या पुरळांना, जखमांना स्पर्श करू नका.
◼️ वारंवार साबणाने हात धुवा आणि स्वच्छता पाळा.
◼️ ताप, पुरळ किंवा सूज आल्यास त्वरित आरोग्य केंद्रात तपासणी करून घ्या.
◼️ अफवा किंवा चुकीच्या माहितीवर विश्वास ठेवू नका.
◼️ आजारांची लक्षणे ओळखून त्वरीत उपचार घ्यावे.
जगभरात आजाराचे थैमान
◼️ मंकीपॉक्सचा पहिला रुग्ण १९७० मध्ये काँगो येथे आढळला.
◼️ २०२२ मध्ये या आजाराचे जगभरात हजारो रुग्ण नोंदले गेले.
◼️ जागतिक आरोग्य संघटनेने यास सार्वजनिक आरोग्य आणीबाणी घोषित केली होती.
◼️ भारतातही काही ठिकाणी प्रकरणे आढळली असून आता धुळ्यातील रुग्णामुळे राज्यातील आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे.
मंकीपॉक्स हा घाबरण्यासारखा नाही; पण सतर्क राहणे अत्यावश्यक आहे. संसर्गाचा संशय आल्यास त्वरित जवळच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा.
अधिक वाचा: पुढील दोन महिने रेशनवर 'हे' पौष्टिक तृणधान्य मिळणार मोफत; जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना सूचना
