छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यातील दुग्ध व्यवसाय सध्या मोठ्या आर्थिक संकटात सापडलेला आहे. बाहेरील मोठ्या दूध ब्रँड्सनी शहरातील बाजारपेठेत आपली मुळे घट्ट रोवली असून, त्यामुळे स्थानिक सहकारी दूध संघांचे उत्पन्न लक्षणीय घटले आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या तीन वर्षात दूध विक्रीत जवळपास ४०% घट झाली आहे.
कधी काळी दररोज ५० हजार लिटर दूध विकणाऱ्या संघाची विक्री ३० हजारांवर आली आहे. यामागील कारण म्हणजे बाहेरून येणाऱ्या ब्रँड्सचा वाढता शिरकाव. विशेषतः मुंबई, पुणे, जळगाव, गुजरातच्या नामांकित कंपन्यांचे दूध ब्रेड्स शहरातील किराणा दुकाने, मॉलमध्ये सहज उपलब्ध होते. मराठवाडा दूध उत्पादनांचे रक्षण केले नाही, तर केवळ दुग्ध व्यवसायच नव्हे, तर ग्रामीण अर्थव्यवस्थेवर याचा दूरगामी परिणाम होऊ शकतो.
अशी होते दूध विक्री
- सहकारी संस्था - ६७,००० प्रतिलिटर
- खासगी दूध वितरक - ५ लाख, २० हजार प्रतिलिटर
- शहराबाहेरील ब्रँड - १ लाख, २० हजार प्रतिलिटर
ब्रडिंगचा फायदा
स्थानिक सहकारी संस्थांकडे अद्ययावत तंत्रज्ञान, कौशल्य असूनही सरकारी धोरणांच्या उदासीनतेमुळे त्यांना स्पर्धेत टिकणे अवघड झाले आहे. याचाच फायदा बाहेरील ब्रँड घेत आहेत.
शेतकऱ्यांना प्राधान्य द्या
संभाजीनगर दूध उत्पादक संघाच्या देवगिरी महानंदला शासनाच्या मदतीची गरज आहे. अनेकदा अन्न व औषधी प्रशासनाकडून केवळ आमच्याच दुधाचे सॅम्पल तपासणीसाठी घेतले जाते. खासगी ब्रँडसला सूट दिली जाते. बाहेरील ब्रँडसला कुठलेही बंधन नाही. ते सर्रास आपल्या दुधाची विक्री करतात. आपला दूध संघ हा मराठवाड्याच्या मातीतला एकमेव मोठा दूध संघ आहे. येथील तळागाळातील शेतकऱ्यांपर्यंत जाऊन आम्ही दुधाचे संकलन करतो. त्यामुळे येथे मराठवाड्यातील शेतकऱ्यांना प्राधान्य असावे.
- सुरेश पहाडिया, व्यवस्थापकीय संचालक, दूध संघ
दुष्काळात तेरावा महिना
जळगाव, अहिल्यानगरमधून काही दुधाचे ब्रँड येथे विक्रीसाठी येतात. ते आपल्याकडच्या विक्रेत्यांना जास्त सवलतीने दूध देतात. त्यामुळे त्यांचा खप वाढलेला दिसतो. मराठवाडा हा दुष्काळी भाग आहे. जनावरांना मुबलक प्रमाणात चारा उपलब्ध होण्यात अडचणी येतात. याचाच परिणाम दुधावर होतो. आमच्या ब्रँडचा खप वाढवण्याचा प्रयत्न सुरू आहे.
- जगन्नाथ काळे, दूध संघ