मनरेगातील योजनेतील (MGNREGA) कामांना ब्रेक लागल्यामुळे कामगारांच्या हाताला काम मिळत नव्हते. यासंदर्भात राज्यभरात गदारोळ उडाल्यामुळे आता थांबलेल्या कामांना मंजूरी देत गती मिळणार आहे.
मनरेगातील योजनेतील (MGNREGA) शासनस्तरावरून मंजूर करण्यात आलेल्या आणि सुरू न झालेल्या सिमेंट रोड, पेव्हर ब्लॉक आणि पाणंद रस्त्याच्या सार्वजनिक कामांना स्थगितीचा आदेश महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेचे आयुक्त रवींद्र ठाकरे यांनी काढले होते.
यावर राज्यभरात मोठा गदारोळ उडाला होता. दरम्यान, राज्य शासनाच्या मनरेगा विभागाने याप्रकरणी २० मार्च रोजी सुधारित आदेश काढत ३१ डिसेंबर २०२३ नंतरची सर्व मंजूर कामे सुरू करण्यात मंजुरी दिली आहे. त्यामुळे आता परभणी जिल्ह्यातील थांबलेल्या २३९१ कामांचा मार्ग मोकळा झाला आहे.
महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत (MGNREGA) महायुती सरकारच्या काळामध्ये तत्कालीन रोजगार हमी मंत्री यांनी पांदण रस्ते, सिमेंट रोड आणि पेव्हर ब्लॉक या कामांना मोठ्या प्रमाणावर मंजुरी दिली.
इतर योजनेत कामे मिळत नसल्याने ग्रामपंचायतीकडून या योजनेतील कामाची मागणीही वाढली गेली. सार्वजनिक कामामध्ये सिमेंट रस्ता (९०:१०) आणि पेव्हर ब्लॉक (९५:०५) या कामात कुशल निधीची रक्कम जास्त असल्याने कामे झपाट्याने पूर्ण होत गेली.
कामे पूर्ण होताच एफटीओ (FTO) तयार करून शासनाकडे कामाचा कुशल निधी मागणीचा ओघ वाढला गेला. त्यामुळे शासनाकडे कुशल निधी मोठ्या प्रमाणावर थकला गेला. त्याचबरोबर कुशल कुशल प्रमाण राखले जात नसल्याने महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेचे (MGNREGA) आयुक्त रवींद्र ठाकरे यांनी ५ डिसेंबर २०२४ रोजी सार्वजनिक कामांना अचानक ब्रेक लावला होता.
नवीन सार्वजनिक कामांना वर्क कोड देण्यात येऊ नये, वर्क कोड देण्यात आली आहेत. मात्र, अद्याप कामे सुरू झाली नाहीत अशी सार्वजनिक कामे यापुढे सुरू करण्यात येऊ नयेत, असे निर्देश दिले होते. त्यामुळे सार्वजनिक कामे ठप्प झाली होती. त्यामुळे सर्व स्तरातून नाराजी व्यक्त करत कामे पुन्हा सुरू करण्याची मागणी होत होती. (MGNREGA)
चालू वर्षातील मंजूर कामे सुरू करता येणार नाही
* चालू वर्षातील मंजूर आराखड्यामधील कुशल खर्च प्रदान (सी.सी. रोड, पेव्हर ब्लॉक, संरक्षण भिंती, सीएनबी) वैयक्तिक सार्वजनिक सामूहिक लाभाची कामे मात्र सुरू न करण्याचे आदेश या पत्रात दिले आहेत.
* त्यामुळे मातोश्री पाणंद योजनेत पूरक अनुदान दिलेल्या कामामध्ये ६०:४० चे प्रमाण राखण्यासाठी पाणंद रस्त्याची सुरू असलेली कामे पूर्ण झाल्याशिवाय नवीन शेतरस्ता कामास कार्यारंभआदेश देण्यात येऊ नये, असे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे ती अडचण झाली होती.
जिल्हा परिषदकडून मात्र आदेश नाही
राज्य शासनाने मनरेगाच्या सार्वजनिक कामांसंदर्भात आयुक्तांनी स्थगिती उठविण्याचे आदेश देत कामे सुरू करण्यात यावीत, असे निर्देश २० मार्च रोजी काढले असले तरी अद्याप जिल्हा परिषदेकडून मात्र तालुकापातळीवर आदेश वितरित करण्यात आले नसल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली.
२,३९१ कामांना लागला होता ब्रेक
'मनरेगा' आयुक्तांनी ५ डिसेंबर रोजी आदेश निर्गमित केल्यानंतर जिल्ह्यातील २,३९१ कामे थांबली होती. यात पाथरी तालुक्यातील ५६३ कामांचा समावेश होता. आता नवीन आदेशामुळे सिमेंट रस्ते, पेव्हर ब्लॉक, पाणंद रस्त्यांच्या कामांना गती येणार आहे.