Join us

टोमॅटो प्रक्रिया उद्योगासाठी मिळतंय भरघोस अनुदान; घ्या या योजनेचा लाभ

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2025 10:31 IST

pmfme scheme केंद्र सरकारच्या आर्थिक मदतीतून प्रत्येक जिल्ह्यात पंतप्रधान सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजना (पीएमएफएमई) राबविली जाते.

पुणे : केंद्र सरकारच्या आर्थिक मदतीतून प्रत्येक जिल्ह्यात पंतप्रधान सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजना (पीएमएफएमई) राबविली जाते. त्यानुसार पुणे जिल्ह्यात या योजनेंतर्गत आतापर्यंत २६६ प्रकरणे मंजूर करण्यात आली आहेत.

त्यासाठी ३६ कोटी रुपयांचे कर्ज मंजूर करण्यात आले आहे. तर आतापर्यंत २२ कोटी रुपयांचे कर्ज वितरित करण्यात आले आहे. 

याच योजनेतील एक जिल्हा एक पीक या उपक्रमात जिल्ह्यात टोमॅटो पिकाचा समावेश करण्यात आला असून, त्या अंतर्गत २२ प्रक्रिया उद्योग सुरू करण्यात आले आहेत.

या योजनेंतर्गत अनुसूचित जाती, जमाती, महिला यांना प्राधान्य देण्यात येणार आहे. त्यासाठी विविध प्रशिक्षणावर भर दिला जाणार आहे. 

काय आहे पीएमएफएमई?प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजनेसाठी केंद्र सरकारकडून अर्थसाह्य मिळते. यात नव्याने उभारणी होणाऱ्या प्रक्रिया उद्योगांना अथवा सध्याचे प्रक्रिया उद्योग यामध्ये अन्नप्रक्रियेसंबंधित सर्व उद्योग (पशुखाद्य, दुग्ध उत्पादन, सायलेज, पोल्ट्री व मांस प्रक्रिया, बेकरी उत्पादन, वन उत्पादन, डाळ मिल, राइस मिल, कडधान्य, तेलबिया, फळे व भाजीपाला, मसाले, लोणचे, पापड, गूळ प्रक्रिया) त्यांचे विस्तारीकरण, बळकटीकरण, बॅण्डिंग व मार्केटिंग याबाबींचा समावेश आहे. ही योजना क्लस्टर आधारित व प्रामुख्याने नाशवंत मालावर आधारित राबविली जात आहे.

योजनेसाठी कोणाला अर्ज करता येईल?या योजनेंतर्गत अनुसूचित जाती, जमाती, महिला यांना प्राधान्य देण्यात येणार आहे. त्यासाठी विविध प्रशिक्षणावर भर दिला जाणार असून, त्याकरिता एकूण खर्चाच्या १०० टक्के अनुदान देण्यात येईल. 

टोमॅटो उद्योगासाठी करा अर्जही योजना एक जिल्हा एक उत्पादन या धर्तीवर राबविण्यात येत असून, पुणे जिल्ह्याकरिता टोमॅटो पिकाची निवड करण्यात आलेली आहे. यापुढे नव्याने उभारणी होणाऱ्या टोमॅटो प्रक्रिया उद्योगांना या योजनेंतर्गत लाभ घेता येईल. टोमॅटो पिकाखाली जिल्ह्यात ६ हजार ३१ हेक्टर क्षेत्र असून या योजनेत जिल्ह्यात आतापर्यंत २२ उद्योगांना मंजुरी देण्यात आली आहे. यासाठी एकूण १ कोटी ४५ लाख रुपयांचे कर्ज मंजूर करण्यात आले आहे. तर अनुदानापोटी ६३ लाख रुपये वितरित करण्यात आले आहेत.

या योजनेत सहभाग घेण्याकरिता http://pmfme.mofpi.gov.in/ या पोर्टलवर ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावेत. अधिक माहितीसाठी कृषी विभागाशी संपर्क साधावा.

टॅग्स :टोमॅटोकाढणी पश्चात तंत्रज्ञानसरकारी योजनाकेंद्र सरकारपंतप्रधानसरकारकृषी योजनापुणेशेतकरीशेतीपीक