Pune : राज्यातील विविध विभागांना नवे मंत्री मिळाल्यानंतर सर्वांनीच कामाला सुरूवात केली आहे. त्याप्रमाणेच राज्याचे नवे पणन मंत्री जयकुमार रावल यांनी महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या वाशी येथील सुविधांना ३० डिसेंबर, २०२४ रोजी भेटी दिल्या. यावेळी त्यांनी सध्या सुरू असलेल्या कामांचा आढावा घेतला आणि अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. त्याबरोबरच कृषी पणन मंडळाच्या अमेरिका, ऑस्ट्रेलिया, युरोपीअन देश, जपान, न्युझीलंड, मलेशिया, द. कोरीया इ. देशांना कृषिमाल निर्यात करण्याकरीता आवश्यक असलेल्या वाशी येथील विकिरण सुविधा केंद्र, उष्ण बाष्प प्रक्रिया केंद्र व भाजीपाला प्रक्रिया केंद्र याबाबतीतील संपूर्ण माहिती सादर करण्यात आली.
दरम्यान, यावेळी विकसित देशांची निर्यात कशा पद्धतीने वाढवता येईल यावर चर्चा करण्यात आली.भारत सध्या जगातील पाचवी अर्थव्यवस्था म्हणून कार्यरत आहे. त्यामुळे आपल्याला आपल्यापेक्षा विकसित अमेरिका व चीन या देशांमध्ये कृषीमालाचे मार्केटिंग कशा पद्धतीने केल्या जाते, याबाबतची माहिती प्राप्त करून घेणेबाबत अधिकाऱ्यांना सुचित केले.
चीनमधील कृषीमालाच्या लागवडीखालील क्षेत्र हे भारताच्या लागवडीखाली क्षेत्राच्या तीन पट असून तेथे उत्पादित कृषीमालाचे मार्केटिंग कशा पद्धतीत केले जाते याबाबत देखील अभ्यास करावा अशा सूचना मंत्र्यांनी केल्या. अतिदूरवरच्या देशांना समुद्रमार्गे कृषिमाल निर्यात करण्यासंदर्भात प्रोटोकॉल विकसित करण्यात आला असून रशिया येथे केळीची चाचणी कन्साईनमेंट पाठवण्यात आली व सदर कन्साईनमेंट यशस्वीरित्या रशिया येथे पोहोचली आहे अशी माहिती कृषी पणन मंडळाचे सरव्यवस्थापक श्री विनायक कोकरे यांनी दिली.
महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ, कृषी उत्पन्न बाजार समिती, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने फेब्रुवारी २०२५ च्या सुमारास विविध कृषीमालाचे निर्यातदार व संबंधित घटकांची एकदिवशीय कार्यशाळा मुंबई येथे आयोजित करण्याबाबत मा. मंत्री यांनी सुचित केले आहे.
सदर बैठकीवेळी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मा. आ. श्री. शशिकांत शिंदे, विधानपरिषद सदस्यः कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती मा. श्री. अशोक डक आणि कृषी उत्पन्न बाजार समिती मुंबईचे सचिव डॉ. पी. एल. खंडागळे व इतर अधिकारी उपस्थित होते.