Join us

Mango Season in Maharashtra : आंबा हंगामाचे गणित बिघडण्याची शक्यता यंदा मार्चमध्ये आंबा नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2024 11:14 IST

यावर्षी पावसाळा लांबला, त्यातच गेले दोन दिवस अवकाळी पावसाने जिल्ह्यात ठिकठिकाणी हजेरी लावली आहे. उशिरापर्यंतच्या पावसामुळे ऑक्टोबर हीट जाणवली नाही आणि आता अवकाळी पावसामुळे थंडीही सुरू झालेली नाही.

रत्नागिरी : यावर्षी पावसाळा लांबला, त्यातच गेले दोन दिवस अवकाळी पावसाने जिल्ह्यात ठिकठिकाणी हजेरी लावली आहे. उशिरापर्यंतच्या पावसामुळे ऑक्टोबर हीट जाणवली नाही आणि आता अवकाळी पावसामुळे थंडीही सुरू झालेली नाही.

त्यामुळे आंबा हंगामाचे गणित बिघडणार असल्याची भीती बागायतदार व्यक्त करत आहेत. यंदाच्या हंगामात मार्चऐवजी एप्रिलमध्येच आंबा बाजारात येण्याची शक्यता अधिक आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात ६६ हजार ४३३ हेक्टर क्षेत्रावर आंबा लागवड असून, हेक्टरी उत्पादकता दोन टन आहे. हवामानातील बदलाचा परिणाम आंबा पिकावर होत आहे. यावर्षी पावसाळा लांबला.

अधिक वाचा: कोकणातील आंब्याचे अवेळी पाऊस व गारपीटीमुळे होणाऱ्या नुकसान भरपाईसाठी विमा योजना

ऑक्टोबर हीट जाणवलीच नाही. आंब्यासाठी पोषक उष्णता निर्माण झाली नाही. ऑक्टोबरमध्ये पालवी येते. पालवी जून होण्यास किमान दीड महिन्याचा कालावधी जातो. त्यामुळे नोव्हेंबरमध्ये थंडी सुरू झाली की, झाडांच्या मुळांवर ताण येऊन मोहोर प्रक्रिया सुरू होते.

आता नोव्हेंबर निम्मा संपला तरी पालवी सुरू झालेली नाही. दोन दिवस सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे यावर्षी पालवी प्रक्रिया सुरू होण्यास आधीच दीड महिन्याचा विलंब झाला आहे, शिवाय पावसामुळे अजून उशीर होण्याचीही शक्यता आहे.

डिसेंबरमध्ये पालवी सुरू झाल्यास जानेवारीच्या शेवटी किंवा फेब्रुवारीत मोहोर येईल, त्यानंतर असलेल्या थंडीवर फळधारणा अवलंबून आहे. या कारणांमुळे यावर्षी मार्चमध्ये आंबा बाजारात न येता, एप्रिलमध्येच त्याचे आगमन होण्याची शक्यता आहे.

मार्चमध्ये दर अधिक मिळतो. मात्र मार्चमध्ये अल्प फळ हाती येईल, असे दिसत आहे. संक्रांतीच्या काळात थंडीमुळे थ्रीप्सचा प्रादुर्भाव वाढतो. त्यामुळे थंडीवर मोहोर व फळधारणेचे भवितव्य अवलंबून आहे. त्याचा परिणाम केवळ हंगाम पुढे जाण्यावरच नाही तर आंबा उत्पादनावर होण्याचीही भीती आहे.

पावसामुळे पालवी अद्याप सुरू झालेली नाही. ऑक्टोबरमध्ये काही ठिकाणी किरकोळ स्वरूपात पालवी आली होती परंतु करपा रोगामुळे करपली आहे. यावर्षीचा हंगाम उशिरा होणार असून पीकही अत्यल्प असेल. - राजन कदम, बागायतदार

टॅग्स :आंबाशेतीशेतकरीहवामानतापमानरत्नागिरीकोकणफलोत्पादन