Pune Mango Festival : ग्राहकांना थेट शेतकऱ्यांकडून खात्रीशीर हापूस आंबा विकत घेता यावा यासाठी महाराष्ट्र राज्य पणन महामंडळाकडून आंबा महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. यंदा हा हापूस आंबा महोत्सव १ एप्रिलपासून सुरू झाला असून या आंबा महोत्सवास ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. यासोबतच थेट कोकणातील शेतकऱ्यांकडून ग्राहकांना उत्पादक ते ग्राहक अशी विक्री केली जात आहे.
दरम्यान, पुण्यातील गुलटेकडी मार्केट यार्ड येथे दरवर्षी या आंबा महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. पण यंदा ग्राहकांसाठी प्रथमच पुणे शहरात मार्केटयार्ड सह ४ ठिकाणी आंबा महोत्सवांचे आयोजन करण्यात आले आहे. मार्केट यार्ड येथील पीएमटी बस डेपोजवळ गेट नंबर ९ मार्केटयार्ड, गांधी भवन मैदान-कोथरूड, मगरपट्टा- सिझन्स मॉलजवळ खेळाचे मैदान आणि झेन्सार कंपनीजवळील खेळाचे मैदान, खराडी या ४ ठिकाणी आंबा महोत्सवांचे आयोजन केले आहे.
जीआय टॅगिंग
या महोत्सवामध्ये रत्नागिरी, सिंधुदूर्ग, रायगड, पालघर आणि ठाणे या कोकणातील पाच जिल्ह्यातील भौगोलिक मानांकन (Geographical Indication-GI) मिळालेला हापूस आंबा तसेच राज्यातील केशर, पायरी तसेच इतर वाणांचा आंबा उपलब्ध आहे. यामध्ये जीआय व युआयडी टॅग लावलेला आंबा ग्राहकांना विक्री केला जात आहे. यामुळे उत्पादक शेतकऱ्यांना चांगला भाव मिळत आहे. महोत्सवामध्ये १५० उत्पादकांना १२० स्टॉल उपलब्ध करून दिले आहेत. त्यात हापूस, केशर, पायरी आणि बिटकी (लहान) आंब्याचा समावेश आहे.
महोत्सवामध्ये साधारण १७५ ते ३०० ग्रॅम वजानाच्या आंब्याची विक्री करण्यात येत असून ७०० ते १५०० रूपये प्रती डझन दर आहेत. महोत्सवाच्या पहिल्या आठ दिवसांमध्ये १० हजार डझन आंब्याची विक्री झाली असून सुमारे ९० लाखाची उलाढाल झाल्याची माहिती पणन मंडळाने दिली आहे.