भडगाव : राज्य शासनाच्या किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत भडगाव येथील शेतकरी सहकारी संघामार्फत सुरू करण्यात आलेले शासकीय मका खरेदी केंद्र उद्दिष्ट पूर्ण झाल्याने तात्पुरते बंद करण्यात आले आहे. सुरुवातीला देण्यात आलेल्या १ हजार क्विंटल खरेदी उद्दिष्टापैकी आतापर्यंत ७८५ क्विंटल मका खरेदी करण्यात आली असून वाढीव उद्दिष्ट मंजूर न झाल्याने उर्वरित उत्पादक शेतकरी प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे शासनाने तातडीने वाढीव कोटा मंजूर करून मका खरेदी पुन्हा सुरू करावी, अशी तीव्र मागणी शेतकरी सहकारी संघ आणि शेतकरी वर्गातून होत आहे.
यंदाच्या खरीप हंगामात मक्याचे उत्पादन समाधानकारक झाल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर मका खरेदी केंद्राकडे धाव घेतली. शासनाने मक्याला २,४०० रुपये प्रति क्विंटल असा हमीभाव जाहीर केला आहे. भडगाव शेतकरी सहकारी संघामार्फत दि. १९ जानेवारी २०२६ रोजी काटापूजन करून मका खरेदीस सुरुवात करण्यात आली होती. मात्र शासनाकडून सुरुवातीला केवळ १ हजार क्विंटल खरेदीचेच उद्दिष्ट देण्यात आल्याने खरेदी प्रक्रिया मर्यादित राहिली.
दरम्यान यापासून शेतकरी वंचित राहिले आहे. तातडीने वाढीव उद्दीष्ठ घेऊन शेतकऱ्यांना न्याय मिळावा, अशी मागणी शेतकरी वर्गाकडून करण्यात आली आहे.
२६ शेतकऱ्यांना संदेश; १९ जणांचा मका खरेदी
खरेदी केंद्रामार्फत २६ शेतकऱ्यांना मोबाईलवर संदेश पाठवून मका विक्रीसाठी बोलावण्यात आले होते. त्यापैकी १९ शेतकऱ्यांचा एकूण ७८५ क्विंटल मका खरेदी करण्यात आला आहे. उर्वरित ७ शेतकऱ्यांची मका मोजणी प्रक्रिया सुरू होण्याच्या तयारीत असताना उद्दिष्ट पूर्ण झाल्यामुळे सध्या खरेदी थांबविण्यात आली आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचा मका अजूनही विक्रीच्या प्रतीक्षेत पडून आहे.
२६ शेतकऱ्यांना मोबाइलवर संदेश पाठवून मका विक्रीसाठी बोलावण्यात आले होते. त्यापैकी १९ शेतकऱ्यांचा एकूण ७८५ क्विंटल मका खरेदी केला.
वाढीव उद्दिष्टासाठी प्रशासनाकडे पाठपुरावा
मका खरेदी केंद्र बंद झाल्याने तालुक्यातील उत्पादक शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर भडगाव शेतकरी सहकारी संघामार्फत जिल्हा पणन अधिकाऱ्यांकडे वाढीव उद्दिष्ट मंजूर करण्यासाठी लेखी निवेदन पाठविण्यात आले आहे. शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी शासनाने तात्काळ सकारात्मक निर्णय घेणे गरजेचे असल्याची मागणी करण्यात येत आहे.
लोकप्रतिनिधींनी लक्ष द्यावे
पाचोरा-भडगाव मतदारसंघाचे आमदार किशोर पाटील यांनी शासन दरबारी पाठपुरावा करून भडगाव तालुक्यासाठी वाढीव मका खरेदी उद्दिष्ट मंजूर करून घ्यावे, अशी अपेक्षा शेतकरी वर्गातून होत आहे.
शासनाने मका खरेदीसाठी १,००० क्विंटल उद्दिष्ट दिले होते. त्यानुसार खरेदी करण्यात आली आहे. वाढीव उद्दिष्ट मिळावे यासाठी जिल्हा पणन अधिकाऱ्यांकडे पत्र पाठविले असून सकारात्मक निर्णयाची अपेक्षा आहे
- राजेंद्र लालचंद परदेशी, चेअरमन, शेतकरी सहकारी संघ, भडगाव.
