प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेची अंमलबजावणी करताना १ ऑक्टोबर २०२५ ते २७ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत प्राप्त अर्जापैकी १ लाख ८ हजार घरांवर सौरऊर्जा प्रकल्प बसवून महाराष्ट्र राज्याने देशात प्रथम क्रमांक मिळविला आहे.
देशात या कालावधीत प्राप्त अर्जापैकी एकूण ५ लाख ५७ हजार २२४ घरगुती ग्राहकांकडे सौरऊर्जा प्रकल्प बसविण्यात आले. त्यांपैकी १९ टक्के प्रकल्प महाराष्ट्रात बसविण्यात आले.
१ ऑक्टोबर २०२५ ते २७ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत प्राप्त झालेल्या अर्जापैकी किती अर्जदारांच्या घरी सौरऊर्जा प्रकल्प बसविण्यात आले, याचा विचार करण्यात आला आहे. यामध्ये महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे.
उत्तर प्रदेश (९५ हजार ६६५), गुजरात (९४ हजार ३६४), राजस्थान (३९ हजार ४८४) व केरळ (३६ हजार ८३६) ही राज्ये अनुक्रमे दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या व पाचव्या क्रमांकांवर आहेत.
घरगुती ग्राहकांना किती अनुदान ?
• एक किलोवॅट क्षमतेसाठी ३० हजार रुपये
• दोन किलोवॅटसाठी ६० हजार रुपये
• तीन किलोवॅटसाठी ७८ हजार रुपये अनुदान
महिना ३०० युनिटपर्यंत वीजवापर असलेल्या घरगुती ग्राहकांचे वीजबिल शून्य व्हावे, अतिरिक्त वीज विकून त्यांना उत्पन्नही मिळावे यासाठी ही योजना सुरू आहे. एक किलोवॅट क्षमतेच्या प्रकल्पातून दरमहा सुमारे १२० युनिट वीज निर्माण होते. छतावरील सौरऊर्जा निर्मिती प्रकल्पातून ग्राहकांच्या गरजेपेक्षा जास्त वीज निर्माण झाल्यामुळे त्याचे बिल शून्य होते. अतिरिक्त वीज विकून त्याला उत्पन्नही मिळते. एकदा सौरऊर्जा प्रकल्प बसविला की त्यातून २५ वर्षे वीजनिर्मिती होते. - लोकेश चंद्र, अध्यक्ष, महावितरण.
पाच लाख वीज ग्राहकांसाठी स्मार्ट योजना
दारिद्रयरेषेखालील व महिना १०० युनिटपेक्षा कमी वीजवापर असलेल्या गरीब गटातील एकूण पाच लाख वीजग्राहकांसाठी स्मार्ट योजना सुरू आहे.
