Join us

Mahabaleshwar Strawberry : महाबळेश्वरच्या मातीत पिकतेय १४ प्रकारची स्ट्रॉबेरी! जाणून घेऊया सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2024 15:28 IST

Mahabaleshwar Strawberry शेतकऱ्यांच्या परिश्रमाचे व कृषी यशाचे प्रतीक म्हणून स्ट्राॅबेरीकडे पाहिले जाते. या स्ट्रॉबेरीच्या विविध जाती आता विकसित झाल्या असून, महाबळेश्वरच्या मातीत एक-दोन नव्हे तर १४ जातीच्या स्ट्रॉबेरीची लागवड केली जात आहे.

सचिन काकडेसातारा : शेतकऱ्यांच्या परिश्रमाचे व कृषी यशाचे प्रतीक म्हणून स्ट्राॅबेरीकडे पाहिले जाते. या स्ट्रॉबेरीच्या विविध जाती आता विकसित झाल्या असून, महाबळेश्वरच्या मातीत एक-दोन नव्हे तर १४ जातीच्या स्ट्रॉबेरीची लागवड केली जात आहे.

महाबळेश्वरचे थंड वातावरण, इथली माती स्ट्रॉबेरीसाठी पोषक आहे. त्यामुळे प्रथम ब्रिटिशांनी इथल्या मातीत स्ट्रॉबेरीची लागवड केली. पुढे जाऊन हेच फळ तालुक्याचे मुख्य पीक बनले अन् महाबळेश्वरला ‘स्ट्रॉबेरी लँड’ अशी भौगोलिक ओळखही मिळाली.

पूर्वी तालुक्यात स्ट्रॉबेरीच्या एक-दोन जातींची लागवड केली जात होती. मात्र, दहा वर्षांत स्ट्रॉबेरीच्या विविध जाती विकसित झाल्याने शेतकऱ्यांकडून काही जातींची प्रायोगिक तत्त्वावर लागवड करण्यात आली.

प्रयाेग यशस्वी झाल्याने आता विविध १४ प्रकारच्या स्ट्रॉबेरीची शेतकरी लागवड करू लागले आहेत. महाबळेश्वर तालुक्यात २० टक्के विंटर डाऊन तर ८० टक्के अन्य जातीच्या रोपांची लागवड केली जाते.

विंटर डाऊन या रोपांना लवकर फळे लागतात. ती गोडीला कमी असतात. त्यामुळे महाबळेश्वर वगळता अन्य ठिकाणी ८० टक्के शेतकरी या जातीची लागवड करतात.

२ हजार ३०० शेतकरीमहाबळेश्वर तालुक्यात स्ट्रॉबेरीचे क्षेत्र हळूहळू वाढू लागले आहे. यंदा २ हजार ३०० शेतकऱ्यांकडून २ हजार ८०० एकर क्षेत्रावर स्ट्रॉबेरी लागवड करण्यात आली आहे.

या आहेत जातीविंटर डाऊन, एलियाना, फोर्च्युना, ब्रिलियन्स, ब्युटी, पल्मारिटा, पार्थियॉन, स्वीट सेन्सेशन, कॅमाराेजा, मिलिसा, मिलिसॉल, स्पेन एन्ड्रियल, विवारा, मुरानो इत्यादी.

विदेशातून येतात रोपेस्ट्रॉबेरी रोपांची आवक इटली, स्पेन व इजिप्त येथून होते. या ठिकाणाहून येणाऱ्या मदर प्लांटपासून डॉटर प्लांट तयार केले जातात. एका मदर प्लांटपासून जवळपास ५० डॉटर प्लांट तयार होतात. रोपे तयार होताच त्यांची शेतात लागवड केली जाते.

स्ट्रॉबेरी हे तालुक्याचे मुख्य पीक आहे. पूर्वी दोन जातींची येथे लागवड केली जात होती. आता १४ प्रकारच्या जातींची लागवड करून शेतकरी उत्पादन घेत आहेत. पर्यटकांनाही वेगवेगळ्या स्ट्रॉबेरीची गोडी चाखायला मिळत आहे. - किसनशेठ भिलारे, चेअरमन, महाबळेश्वर सहकारी फळे, फुले, भाजीपाला खरेदी-विक्री संस्था

अधिक वाचा: दोन पॉलिहाऊस अन् ६५ शेडनेट, इंदापूर तालुक्यातील ह्या गावाला शेडनेटचं गाव म्हणून ओळख

टॅग्स :महाबळेश्वर गिरीस्थानशेतकरीशेतीपीकफलोत्पादनफळेलागवड, मशागत