Join us
Daily Top 2Weekly Top 5

डोळ्यांदेखत पिकांचे नुकसान; शेतकरीराजा चिंतातूर काय करावे सुचेना?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2024 16:27 IST

मागील दोन- तीन दिवसांपासून जालना जिल्ह्यात पावसाने थैमान घातल्यामुळे येथील पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे.

रविवारी रात्री व सोमवारी दिवसभर झालेल्या मुसळधार पावसामुळे जालना जिल्ह्यात १ लाख ७६ हजार ३६२ हेक्टरवरील पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. यातील सुमारे दीड लाख हेक्टर शेती कोरडवाहू आहे.

पावसामुळे आलेल्या पुरात जिल्ह्यातील ७३ जनावरे वाहून गेल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे. शासनाने नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. यानुसार, जिल्ह्यात प्रशासन व कृषी विभागाकडून नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.

मागील वर्षी दुष्काळाचे चटके सहन केलेल्या जालना जिल्ह्यात यंदादेखील कोरडा दुष्काळ पडण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र, दोन दिवस जिल्ह्यातील विविध तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. मात्र, जोरदार पावसाचा शेतीला मोठा फटका बसला आहे.

पाथरवाला उच्च पातळी बंधाऱ्यातून विसर्ग

वडीगोद्री अंबड तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने पाथरवाला बुद्रुक येथील उच्च पातळी बंधारा भरला असून सोमवारी सकाळी पाच गेट उघडण्यात आले. दुपारी दोन गेट बंद करून तीन गेटद्वारे खाली गोदावरी पात्रात विसर्ग सुरू आहे.

अंबड तालुक्यातील सोनक पिंपळगाव येथील सुखापुरी फाटा ते सोनक पिंपळगावमार्गे डोमेगावकडे जाणाऱ्या नदीवरील पुलाचे काम सुरू असल्याने पर्यायी केलेला रस्ता रविवारी पुरात वाहून गेला आहे. यामुळे या मार्गावरील रहदारी बंद झाली आहे.

अप्पर दुधना सिंचन प्रकल्प जोत्याखालीच

* बदनापूर तालुक्यातील सोमठाणा येथे दुधना नदीवर अप्पर दुधना प्रकल्प उभारण्यात आलेला आहे. या प्रकल्पामधून या तालुक्यातीलच नव्हे तर शेजारील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील काही गावांनासुद्धा पिण्याचे पाणी मिळते.

* या प्रकल्पामुळे या तालुक्यातील सुमारे पंधरा ते वीस गावांमधील हजारो हेक्टर शेतीला सिंचनासाठी व पिण्यासाठी पाणी मिळते. या प्रकल्पात मुबलक पाणी असल्यास येथे मासेमारीचा व्यवसायसुद्धा मोठ्या प्रमाणावर चालतो.

* अनेकांना यामधून रोजगार उपलब्ध झालेला आहे. बदनापूर शहरालादेखील प्रकल्पातून पाणीपुरवठा करण्यात येतो. सिंचन व पिण्याच्या पाण्यासाठी महत्त्वाचा असलेल्या प्रकल्पात अद्यापही समाधानकारक पाणी आलेले नाही.

जोरदार पावसामुळे घरांचे नुकसान

दोन दिवसांच्या पावसात जिल्ह्यात २७३ घरांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. यात सर्वाधिक घरांची पडझड ही मंठा तालुक्यात झाली आहे. या तालुक्यात १०३ कच्च्या, तर २ पक्क्या घरांचे नुकसान झाल्याची नोंद घेण्यात आली आहे. जालना तालुक्यातही ८ घरांचे नुकसान झाले आहे.

तीन तालुक्यांत पिकांचे मोठे नुकसान

जिल्ह्यात दोन दिवस पावसाने धुमाकूळ घातला. यामध्ये अंबड, घनसावंगी तसेच मंठा तालुक्यातील शेतीचे मोठे नुकसान आले आहे. यात घनसावंगी तालुक्यात ७० हजार ३४ हेक्टरवरील शेतीचे नुकसान झाले. तर अंबड, मंठा तालुक्यात अनुक्रमे ४६ हजार ७२७ हेक्टर व ५९ हजार १२० हेक्टरवरील पिके उद्ध्वस्त झाली आहेत. मुसळधार पावसामुळे आठ तालुक्यातील ३८७ गावे अतिवृष्टीमुळे बाधित झाली आहेत.

टॅग्स :शेती क्षेत्रहवामानपाऊसशेतकरीशेती