Join us

जनावरांची विक्री तीन पटींनी वाढली; चारा पाणी प्रश्न गंभीर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2024 11:56 AM

बाजारात जनावरांची आवक वाढल्याने व्यापर्‍यांकडून कवडीमोल दराने खरेदी

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड, वैजापूर, पैठण, गंगापूर, खुलताबाद, सिल्लोड, सोयगाव तालुक्यात गेल्यावर्षी अल्प पाऊस झाल्यामुळे दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून, सध्या जनावरांना चारा नसल्याने पशुपालक आपली जनावरे विक्रीसाठी बाजारात आणत आहेत, त्यामुळे जिल्ह्यातील अनेक बाजारात जनावरांची विक्री तीनपटीने वाढली आहे.

जिल्ह्यातील खुलताबाद तालुक्यात जून पर्यंत तर कन्नड तालुक्यात अवघा महिनाभर पुरेल इतपत चारा शिल्लक असून या भागातील शेतकरी चारा छावणी सुरू करण्याची मागणी करत आहे. तर वैजापूर तालुक्यात पाणी टंचाई अधिक प्रमाणात गंभीर होत असून सिल्लोड, सोयगाव आणि पैठण भागातील जनावरांच्या बाजारात जनावरांच्या किमती कमालीच्या घटल्या आहेत. 

अलीकडे शेतीलाशेतीपूरक जोडधंदा म्हणून अनेक शेतकर्‍यांनी गायींची खरेदी केली होती. मात्र गेल्या वर्षीच्या खरीप सह रब्बीत चारा उत्पादन घटल्याने तसेच अल्प पाऊसामुळे जनावरांच्या चान्याचा व पाण्याच्या प्रश्न गंभीर झाला आहे.  यामुळे अनेक शेतकरी आपल्या दारातील पशुधन आठवडी बाजारात कवडीमोल भावात विकत आहेत.

हेहि वाचा -  शेळीपालनात उत्पन्नाची हमी; वर्षभर मागणी असलेला शेतीपूरक व्यवसाय

बाजारात गेल्या काही दिवसांपासून जनावरांची आवक वाढल्याने व्यापारीही कवडीमोल दराने त्यांची खरेदी करीत आहेत. दोन महिन्यांनी मात्र जेव्हा शेतकरी शेती मशागतीकरिता ही जनावरे बाजारात खरेदी करण्यासाठी जातील तेव्हा मात्र त्यांना अधिक दाम द्यावे लागतील अशीही चर्चा यानिमित्ताने जाणकार वयोवृद्ध शेतकरी करत आहे. 

टॅग्स :दुग्धव्यवसायपाणीकपातदूधशेतकरीशेतीमराठवाडा