भंडारा : शेतीकडे पाठ फिरवणाऱ्या तरुणांसाठी आशेचा नवा किरण ठरत 'युवा शेतकरी मंच' सुरू करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी यांच्या संकल्पनेतून कृषी विभागाने उभारलेल्या या मंचाच्या माध्यमातून आधुनिक शेती तंत्रज्ञान, प्रशिक्षण, नेटवर्किंग व बाजारपेठेशी थेट जोडणी केली जाणार असून, शेतीला नफा व स्थैर्य देत तरुण शेतकऱ्यांना सक्षम करण्याचा हा उपक्रम आहे.
युवा शेतकरी मंचाचा मुख्य उद्देश तरुणांना शेतीकडे वळविणे, पिकांचे विविधीकरण करणे, शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढविणे तसेच कुशल मनुष्यबळाच्या माध्यमातून रोजगार निर्मिती करणे हा आहे. याअंतर्गत ड्रिप इरिगेशन, संरक्षित शेती, फळबाग व भाजीपाला लागवड, पिकांचे विविधीकरण, स्मार्ट फार्मिंग, ड्रोनचा वापर, आधुनिक फार्म मशिनरी याबाबत सखोल प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
मूल्यवर्धनाला चालना
शेतमाल विक्रीसाठी योग्य व स्थिर बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी मार्केट लिंकेज विकसित करण्यात येणार आहे. याअंतर्गत अॅग्रो-स्टार्टअप, शेतमाल प्रक्रिया व मूल्यवर्धनासाठी तज्ज्ञांकडून मार्गदर्शन दिले जाणार आहे. अनुभवी व यशस्वी शेतकऱ्यांशी थेट संवाद, परस्पर अनुभवांची देवाण-घेवाण तसेच इतर जिल्ह्यांतील यशस्वी शेती मॉडेलची पाहणी हा युवा शेतकरी मंचाचा महत्त्वाचा भाग असणार आहे.
नोंदणीसाठी आवाहन
जिल्ह्यातील १८ ते ४० वयोगटातील तरुण शेतकरी, कृषी शिक्षण घेणारे विद्यार्थी, अॅग्रो-स्टार्टअप सुरू करू इच्छिणारे युवक तसेच कृषी उद्योजक या मंचात सहभागी होऊ शकतात. शासनाच्या विविध योजनांचा लाभघेण्यासाठी मार्गदर्शन, कर्ज व अनुदानाबाबत माहिती दिली जाणार आहे. युवा शेतकरी मंचासाठी नोंदणीची अंतिम मुदत ४ जानेवारी २०२६ आहे. मोहाडी तालुक्यातील जास्तीत जास्त शेतकरी तरुणांनी सहभागी व्हावे, असे आवाहन मोहाडी तालुका कृषी अधिकारी सुनील भडके यांनी केले आहे.
