Join us

जागतिक जलदिन : शेतीमध्ये तंत्रज्ञान वापराल, पाण्याची बचत कराल तर उत्पादनात वाढ निश्चित

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2024 4:43 PM

वातावरण बदलाच्या परिणामाची आणि पाणी दुर्भिक्षाची झळ कमी करावयाची असल्यास आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर शेतीमध्ये करणे हे अनिवार्य आहे.

प्रामुख्‍याने निसर्गत: उपलब्‍ध होणारे पाणी आणि त्‍याचा होणारा –हास यावर पृथ्‍वीवरील जैविक अन्‍नसाखळी अवलंबुन आहे. पाण्‍याची उपलब्‍धी आणि –हास यातुन राहणा-या पाण्‍याचे प्रमाण आणि प्रत यावर पृथ्‍वीवरील सर्व सजीवाचे जगणे ठरते. याच अनुषंगाने बोलायचे झाले तर, शेती उत्‍पादनामध्‍ये पाणी हा प्रमुख घटक आहे. प्रामुख्‍याने या घटकाचाच  शेती उत्‍पादनावर परिणाम जगभरात होत असलेला दिसून येतो. 

जागतिक पातळीवर मनुष्‍याच्‍या एकुण पाणी वापरापैकी मुख्‍यत: शेती या घटकामध्‍ये पाण्‍याचा वापर दोनतृत्‍तीयांश होतो. तर कोरडवाहू वातावरणात येणारे बहुतांश देश प्रामुख्‍याने उपलब्‍ध असणा-या शुध्‍द पाण्‍याचा ८० टक्‍के वापर शेती सिंचनाकरीता करतात. यामुळे पाण्‍याचे गणित, त्‍याचे शास्‍त्र, उपलब्‍धी प्रमाण आणि –हास याचा अभ्‍यास करणे अतिशय महत्‍वाचे आहे. तसेच पीक उत्‍पादन घेण्‍यासाठी पाण्‍याची असणारी उपलब्‍धी आणि त्‍यानुसार लागणारे अचुक सिंचन पातळी काढणे आवश्‍यक आहे. यासाठी हवामान बदल आणि त्‍याचे होणारे विविध परिणाम याची माहिती पाहणे, आजच्या दिवशी  (२२ मार्च) ‘जागतिक जल दिनाच्या’ निमित्ताने उद्बोधक ठरावे.    

पाण्‍याची उपलब्‍धी कमी झाल्‍यामुळे सकल राष्‍ट्रीय उत्‍पन्‍नातील शेतीचा वाटा सन १९६१ ला ५७ टक्‍के होता. यावरून सन १९८७-८८ मध्‍ये ३५ टक्‍के आणि २००१-०२ मध्‍ये २२ टक्‍के वर आला होता. सदयस्थितीत तो आणखी कमी होऊन सन २०२२-२३ मध्ये १५% इतका खाली आला आहे. सन १९५१ मध्‍ये शेतीचा एकून भारतीय सकल उत्‍पादनातील वाटा ५६ टक्‍के होता,  सन २००१-०२ मध्‍ये २५ टक्‍के वर आला, तर सद्यस्थितीत १७.५ % वर येऊन पोहोचला आहे.  तर सन २००१ च्‍या जनगणनेनुसार एकुण कामगाराच्‍या जवळपास ६० टक्‍के कामगार हे शेतीत राबणारे होते, असा अहवाल ‘सुसाईड ऑफ फारमरस इन महाराष्‍ट्रा’ हा श्रीजीत मिश्रा यांनी सन २००६ मध्‍ये महाराष्‍ट्र शासनाला सादर केला होता. 

सद्य:स्थितीत भारतामध्ये ४३% मनुष्यबळ हे शेतीमध्ये राबत आहे. वरील सर्व बाबींचा विचार केल्‍यास भारतीय जीवनात पाण्‍याचे महत्‍व अति संवेदनशील आहे. म्‍हणूनच आपण जल दिवसानिमित्‍त गंभीर होऊन निसर्गत: उपलब्‍ध असणारे पाणी आणि आपले जलचक्र याबाबत जागृत राहूयात. जगाची लोकसंख्या गेल्या पाऊण  शतकात तिप्पटीने वाढली आहे. तर, बदलते  राहणीमान आणि शहरीकरण तसेच औदयोगिकरण यामुळे पाणी वापर सहा पटीने वाढला आणि पाण्याची मागणी मात्र १८ पटीने वाढली आहे. यामुळे शुध्‍द पाण्‍याचा तुटवडा सन २०२५ पर्यंत जवळपास ७८ टक्‍के  जाणवेल. तर, सन २०५० मध्‍ये जवळपास ७०% ची घट शेतीकरीता उपलब्‍ध पाण्‍यामध्‍ये येण्‍याचा अंदाज वर्तविलेला आहे.

वातावरण बदलाच्या परिणामाची आणि पाणी  दुर्भिक्षाची झळ कमी करावयाची असल्यास आधुनिक विज्ञान- तंत्रज्ञान याचा वापर म्हणजे उदयोन्मुख  तंत्रज्ञानाचा वापर करणे हे अनिवार्य आहे. उदयोन्मुख  तंत्रज्ञानामध्ये प्रामुख्याने माहिती तंत्रज्ञान (इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी-आय टी), कृत्रिम प्रज्ञा (आर्टिफिशिअल इंटेलिजन्स-ए आय), वस्तू जाल (इंटरनेट ऑफ थिंग्स-आय ओ टी), ब्लॉकचेन तंत्रज्ञान (ब्लॉगचेन टेक्नॉलॉजी) याचा समावेश होतो. शेतीमध्ये रोबोटिक्स व कृत्रिम प्रज्ञा वापरून नियंत्रित शेती केल्याने पारंपारिक शेती पद्धतीच्या, १००% च्या  तुलनेत १% जमीनीवर आणि ५% पाणी वापरून, पारंपारिक पद्धतीच्या १००%  इतके उत्पादन काढता येते, हे सिद्ध झाले आहे. या तंत्रज्ञानामुळे नियंत्रित शेती जोडधंद्यामध्ये किंवा शेतीपूरक व्यवसायामध्ये जवळपास ५०-७५ टक्के उत्पादनात खर्चात बचत करता येते, तर पाणी वापरामध्ये ७० ते ८० टक्के बचत करता येते आणि उत्पादनामध्ये दुप्पट ते तिप्पट वाढ करता येते.  उदयोन्मुख  तंत्रज्ञानाचा अर्धनियंत्रित शेती आणि जोडधंदा यामध्ये वापर केल्याने जवळपास ५० ते ७५ टक्के पर्यंत जमिनीची बचत करता येते तर, ३० ते ७० टक्के पर्यंत पाणी बचत करता येते आणि उत्पादनात दीडपट्ट ते दुप्पट वाढ करता येते.

पारंपारिक शेतीमध्ये हे तंत्रज्ञान वापरल्याने ३० ते ५० टक्के उत्पादनात वाढ करता येते, उत्पादन खर्च ५० टक्के पर्यंत कमी करता येत येतो. ३० ते ४० टक्के पर्यंत पाणी बचत करता येते.आणि अर्थातच यामुळे प्रदूषणही प्रमाणावर कमी होण्यास मदत होईल, वस्तू जाल (आय ओ टी) या  तंत्रज्ञानामुळे शेती, शेती पूरक व्यवसाय, कृषी आधारित उद्योग आणि इतर औद्योगिकीकरणांमध्ये मोठ्या प्रमाणावर उत्पादन खर्च कमी होवून, पाणी कमी वापरून, उत्पादन दर्जा वाढवता येतो आणि वातावरणाचे प्रदूषण खूप मोठ्या प्रमाणावर कमी करता येते. याचीही सुरुवात आपल्याकडे झाली आहे.

लेखक : प्रा. डॉ. प्रल्‍हाद जायभाये कृषिहवामानशास्‍त्र विभाग 

टॅग्स :शेतीशेतकरीपाणीपाणीकपातजल प्रदूषण