World Soil Day :शेतीचे उत्पादन आणि जमिनीची सुपीकता वाढवण्यासाठी मातीपरीक्षण हा सर्वांत महत्त्वाचा वैज्ञानिक उपाय मानला जातो. जमिनीचे जैविक, रासायनिक व भौतिक गुणधर्म तपासून पिकांना आवश्यक अन्नद्रव्यांचा अचूक पुरवठा करण्यासाठी मातीपरीक्षण आवश्यक आहे.
माती नमुना घेण्याची पद्धत
शेताची पाहणी करून जमिनीच्या प्रकारानुसार विभाग करावेत. प्रत्येक विभागातून कुदळीने 'व्ही' आकाराचा खड्डा करून सारख्या जाडीचा मातीचा थर काढावा. चतुर्थांश पद्धतीने अंदाजे अर्धा किलो प्रतिनिधिक माती स्वच्छ पिशवीत भरून प्रयोगशाळेकडे पाठवावी. खतांचा वापर केल्यानंतर दोन ते अडीच महिने नमुना घेऊ नये.
नमुना कोणत्या खोलीवरून घ्यावा?
धान, ज्वारी, गहू, भुईमूग पिकासाठी १५ ते २० सें.मी. खोलीवरून माती नमुना घ्यावा. कपाशी, ऊस, केळी पिकांसाठी ३० सें.मी. खोलीवरून फळबागेसाठी ३० सें.मी. खोलीवरून नमुना घ्यावा. १० ते १२ झाडांचे नमुने मिश्रस्वरूपात घ्यावेत.
पिकांच्या वाढीसाठी आवश्यक १७ अन्नद्रव्यांपैकी १४ द्रव्ये जमिनीतून मिळतात. यांपैकी एकाही द्रव्याची कमतरता भासल्यास उत्पादनावर थेट परिणाम होतो. सुपीकता कमी होण्यामागे एकाच पिकाची फेरपालट न करणे, सेंद्रिय खतांचा अभाव, रासायनिक खतांचा असंतुलित वापर व अवाजवी पाणीपुरवठा ही प्रमुख कारणे असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.
मातीपरीक्षणामुळे जमिनीतील दोष समजून त्यावर उपाय सुचवता येतात. कोणत्या अन्नद्रव्याची कमतरता आहे, कोणत्या पिकासाठी योग्य आहे, याचे मार्गदर्शन होते. खतांचा अनावश्यक वापर कमी होऊन खर्चात बचत होते. पिकांचे उत्पादन सुधारते आणि जमिनीची सुपीकता टिकून राहते. क्षारयुक्त व चोपण जमिनींच्या सुधारणेस मदत होते.
मातीपरीक्षण आधारित पिकांचे खत व्यवस्थापन करावे. यामुळे खतांचा संतुलित वापर होऊन जमिनीची सुपीकता दीर्घकाळ टिकवून ठेवण्यास आणि उत्पादन क्षमता वाढविण्यास मदत होते. शेतकऱ्यांनी मातीचे आरोग्य जपावे.
- डॉ. माया राऊत, सहयोगी अधिष्ठाता, कृषी महाविद्यालय, गडचिरोली
