Agriculture News : आयुष्यात अनपेक्षित काही घडल्यास आपल्या पश्चात कुटुंबाचे काय होईल, ही काळजी प्रत्येकाला असते. विशेषतः पर्सनल लोन घेतलेल्या व्यक्तीचा मृत्यू झाला, तर ते कर्ज कुटुंबाला फेडावे लागते का, हा प्रश्न अनेकांना सतावतो. या प्रश्नाचे उत्तर 'हो' किंवा 'नाही' इतके सोपे नसून, ते कर्जाचे स्वरूप आणि करारावर अवलंबून असते.
जर एखादे वैयक्तिक कर्ज केवळ एकाच व्यक्तीच्या नावावर असेल आणि त्याला कोणताही 'को-बॉरोअर नसेल, तर त्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याचे कुटुंब ते कर्ज फेडण्यास कायदेशीररीत्या बांधील नसते. बँक मृताच्या पत्नीला किंवा मुलांना त्यांच्या स्वतःच्या खिशातून पैसे भरण्यास सक्ती करू शकत नाही. मात्र, याचा अर्थ कर्ज पूर्णपणे माफ होते असे नाही.
कुटुंबीयांनी काय करावे?
त्वरित माहिती द्या : कर्जदाराचा मृत्यू झाल्यास बँकेला त्वरित कळवावे. कर्जाची स्थिती जाणून घ्या.
तोवर पैसे भरू नका : बँकेचे दायित्व नक्की काय आहे, हे समजल्याशिवाय हप्ते भरणे सुरू करू नका.
मालमत्तेतून वसुलीचा बँकेला अधिकार
बैंक मृताच्या मालमत्तेतून वसुली करू शकते. यामध्ये मृताची बचत खाती, मुदत ठेवी, शेअर्स किंवा जमीन यांचा समावेश होतो. एका व्यक्तीने दहा लाखांची मालमत्ता मागे सोडली व त्यांच्यावर ३ लाखांचे कर्ज आहे, तर बँक त्यातून ३ लाख वसूल करेल. जर मालमत्ताच नसेल, तर ते कर्ज 'राइट ऑफ' होते.
सह-कर्जदार, हमीदार असल्यास सावधान !
एकाचा मृत्यू झाल्यास, दुसऱ्या जिवंत कर्जदाराला कर्जाचे हप्ते भरावेच लागतात. जर तुम्ही कोणाच्या कर्जासाठी हमीदार (गॅरेंटर) म्हणून सही केली असेल, तर कर्जदाराच्या मृत्यूनंतर ती जबाबदारी तुमच्यावर येते.
कर्ज विमा : एक सुरक्षाकवच
जर कर्ज घेताना 'क्रेडिट लाइफ इन्शुरन्स' घेतला असेल, तर 3 कुटुंबाला दिलासा मिळतो. कर्जदाराचा मृत्यू झाल्यास विमा कंपनी उर्वरित रक्कम बँकेला देते. यासाठी कुटुंबाने मृत्यूचा दाखला देऊन विमा कंपनीकडे त्वरित क्लेम करणे आवश्यक असते.
