Join us
Daily Top 2Weekly Top 5

शेतजमिनीत पांढऱ्या बुरशीचा प्रादुर्भाव, कांदा पिकासाठी धोकादायक, कृषी विभागाचे आवाहन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2025 12:41 IST

Agriculture News : ऑक्टोबरमध्ये सलग दहा-बारा दिवस झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी आता नव्या संकटात सापडले आहेत.

नाशिक : जिल्ह्यातील बहुतांश भागात ऑक्टोबरमध्ये सलग दहा-बारा दिवस झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत. पावसामुळे अनेक ठिकाणी शेतजमीन उपळून गेली असून, कांदा रोपांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या उपळलेल्या शेतजमिनीत आता बुरशीचा पांढरा थर दिसू लागल्याने उन्हाळी व रब्बी हंगामातील कांदा उत्पादनावर गंभीर परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे.

अतिआर्द्रता, सलग पाण्याचा प्रवाह आणि ढगाळ वातावरणामुळे जमिनीत बुरशीजन्य घटकांची वाढ झपाट्याने होत आहे. पिळकोस, बेज, भादवण यांसह तालुक्यातील विविध शिवारांमध्ये पिकांच्या मुळांजवळ, ढेकळांवर आणि पृष्ठभागावर पांढरा बुरशीचा जाड थर स्पष्टपणे दिसून येत आहे. या स्थितीमुळे मर रोग, पांढरी कुज व करपा यांसारख्या रोगांचा प्रादुर्भावाची शक्यता शेतकरी व कृषी तज्ज्ञांकडून वर्तवली जात आहे.

...अन्यथा पिकांचे नुकसान होणारशेतकऱ्यांना जमिनीचा योग्य निचरा, खोल नांगरटी, सेंद्रिय खतांचा वापर तसेच रोगप्रतिबंधक फवारणी करण्याचा ताण अधिक वाढणार आहे. येत्या काही दिवसांचे हवामान कोरडे राहिले, तर परिस्थिती काही प्रमाणात नियंत्रणात येईल; अन्यथा बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढून पिकांचे नुकसान होण्याची शक्यता अधिक आहे.

दिवाळी काळातील अतिवृष्टीमुळे उपळलेल्या शेतात बुरशी वाढण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे. जमिनीत जास्त आर्द्रता, सतत पाणी वाहून जाणे आणि तापमानातील चढ-उतार यामुळे पांढऱ्या बुरशीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. ही स्थिती पुढील कांदा पिकासाठी धोक्याची असून, मर रोग, पांढरी कुज यांचा धोका वाढू शकतो. आवश्यक असल्यास जैविक किंवा रासायनिक बुरशीनाशकांचा वापर करावा. पुढील १०-१२ दिवस शेतीची काळजीपूर्वक मशागत करावी. - विठ्ठल रंधे, मंडळ कृषी अधिकारी, कळवण.

ऑक्टोबरमध्ये झालेल्या संततधार पावसामुळे शेतजमीन उपळली आहे. आता शेतात पांढरा बुरशीचा थर सर्वत्र दिसत आहे. या स्थितीत कांदा लागवडीयोग्य बनवण्यासाठी आम्हाला दुप्पट मेहनत करावी लागत आहे.                                                                                                             - किशोर जाधव, युवा शेतकरी, पिळकोस.

English
हिंदी सारांश
Web Title : White Fungus Infestation Threatens Onion Crops; Agriculture Department Issues Advisory

Web Summary : Excessive rain in Nashik causes white fungus in soil, endangering onion crops. Farmers face increased disease risk. Agriculture officials advise immediate preventative measures.
टॅग्स :शेती क्षेत्रशेतीशेतकरीपाऊसकांदा