Wheat Crop Disease : यंदा रब्बी हंगामात गव्हाचा पेरा मोठ्या प्रमाणावर वाढलेला असतानाच, मागील काही दिवसांपासून बुलढाणा व अकोला जिल्ह्यातील काही भागांमध्ये गव्हाच्या पिकावर अज्ञात रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे.(Wheat Crop Disease)
या रोगामुळे गव्हाची पाने पिवळी पडत असून, पिकाची वाढ खुंटल्याचे चित्र अनेक शेतशिवारांमध्ये पाहायला मिळत आहे. परिणामी, उत्पादनात घट होण्याची भीती व्यक्त केली जात असून शेतकरी संकटात सापडले आहेत.(Wheat Crop Disease)
सध्या गहूपीक वाढीच्या महत्त्वाच्या अवस्थेत आहे. मात्र, काही शेतांमध्ये गव्हाची पाने प्रथम फिकट हिरवी होत असून, नंतर पूर्णपणे पिवळी पडत आहेत. (Wheat Crop Disease)
रोपांची उंची अपेक्षेप्रमाणे वाढत नसून फुटव्यांची संख्या कमी होत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. यामुळे दाण्यांची भर कमी राहण्याची आणि उत्पादनावर मोठा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
हवामान व जमिनीतील परिस्थिती कारणीभूत
कृषी तज्ज्ञांच्या मते, अलीकडील काळात तापमानात होत असलेले चढ-उतार, पहाटेचे धुके तसेच जमिनीत टिकून राहिलेली ओल यामुळे रोगाचा प्रादुर्भाव वाढण्यास पोषक वातावरण निर्माण झाले आहे.
काही भागांत जमिनीत अन्नद्रव्यांची कमतरता किंवा बुरशीजन्य संसर्ग असण्याची शक्यताही वर्तविण्यात येत आहे. मात्र, अद्याप नेमका रोग कोणता याबाबत कृषी विभागाकडून अधिकृत निष्कर्ष जाहीर करण्यात आलेला नाही.
आर्थिक गणित कोलमडण्याची भीती
महागडी बियाणे, रासायनिक खते, मशागत आणि पाण्याचा खर्च करून शेतकऱ्यांनी गव्हाची पेरणी केली होती. मात्र, ऐन वाढीच्या काळातच रोगाने शिरकाव केल्यामुळे कीडनाशक व बुरशीनाशकांच्या फवारणीसाठी शेतकऱ्यांना अतिरिक्त खर्च करावा लागत आहे. तरीही अनेक ठिकाणी अपेक्षित परिणाम दिसून येत नसल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
उत्पादन घटल्यास दर वाढण्याची शक्यता
सध्या गव्हाला बाजारात प्रतिक्विंटल २ हजार ३०० ते २ हजार ६०० रुपये दर मिळत आहे. जर रोगाचा प्रादुर्भाव वाढून उत्पादनात मोठी घट झाली, तर आगामी काळात गव्हाच्या दरात वाढ होण्याची शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, याचा थेट फटका उत्पादन कमी झालेल्या शेतकऱ्यांना बसण्याची भीती आहे.
कृषी विभागाचे आवाहन
कृषी विभागाने शेतकऱ्यांना अफवांवर विश्वास न ठेवता तात्काळ शेताची पाहणी करून पिकातील लक्षणांची नोंद करण्याचे आवाहन केले आहे. कोणतीही फवारणी करण्यापूर्वी तालुका किंवा मंडळ कृषी अधिकारी तसेच कृषी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
स्वतःहून औषधांची फवारणी केल्यास खर्च वाढूनही अपेक्षित परिणाम मिळणार नाही, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी पवार यांनी केले आहे.
दरम्यान, कृषी विभागाकडून लवकरच क्षेत्रीय पाहणी करून रोगाची निश्चित ओळख व उपाययोजना जाहीर केल्या जातील, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत आहेत.
