Watermelon Farming : सेलू तालुक्यात यंदा उन्हाळी हंगामातील महत्त्वाचे नगदी पीक असलेल्या टरबूजाच्या लागवडीखालील क्षेत्रात मोठी घट झाल्याचे चित्र आहे. मुबलक पाणी, सुपीक जमीन आणि अनुकूल हवामान असूनही बाजारातील दर अनिश्चिततेमुळे शेतकऱ्यांनी यंदा टरबूज लागवडीकडे पाठ फिरवली आहे. (Watermelon Farming)
गतवर्षीच्या तुलनेत यंदा तब्बल ६०० एकरने टरबूज लागवड घटली असल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली आहे. (Watermelon Farming)
जुलै ते सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे दुधना नदीसह परिसरातील जलसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. पावसाळ्यात आलेल्या पुरामुळे नदीकाठच्या भागात मुबलक पाण्याची उपलब्धता आहे. त्यामुळे सिंचनाचा प्रश्न नसतानाही शेतकऱ्यांनी टरबूजाऐवजी इतर पिकांना प्राधान्य दिले आहे. यामागे प्रमुख कारण म्हणजे बाजारभावातील अनिश्चितता, वाहतूक खर्चात वाढ आणि दर हमीचा अभाव. (Watermelon Farming)
गतवर्षी सेलू तालुक्यातील पावडे हादगाव, कवडधन, राजेवाडी, तळतुंबा आदी गावांमध्ये ८०० एकरांहून अधिक क्षेत्रावर टरबूजाची लागवड झाली होती. त्या वेळी समाधानकारक उत्पादनासह चांगला दर मिळाल्याने शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळाला होता. मात्र, यंदा बाजारात दर किती मिळेल याची कोणतीही खात्री नसल्याने शेतकऱ्यांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.
केवळ २०० एकरांवर लागवड
तालुक्यात साधारणपणे दरवर्षी ८०० एकरांपर्यंत टरबूजाची लागवड होते. मात्र, यंदा सद्यस्थितीत केवळ २०० एकरांवरच लागवड झालेली आहे.
पुढील काळात थोडीफार वाढ होण्याची शक्यता असली तरी उत्पादन खर्च वाढत असताना बाजारभाव हातात नसल्याने जोखीम वाढते, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. परिणामी अनेकांनी लागवडीचे क्षेत्र कमी केले असून, काही शेतकरी ऊस व इतर पिकांकडे वळले आहेत.
रमजानमध्येही मागणी असूनही घट
या भागातील नदीकाठची जमीन टरबूजासाठी अतिशय पोषक आहे. शिवाय रमजान महिन्यात टरबूजाला मोठ्या प्रमाणावर मागणी असते. यामुळे दरवर्षी शेतकरी मोठ्या प्रमाणावर या पिकाची लागवड करत होते. मात्र, यंदा पाणी असूनही दराची हमी नसल्याने टरबूज लागवडीत घट झाली आहे.
कृषी तज्ज्ञांचा सल्ला
कृषी तज्ज्ञांच्या मते, टरबूजासारख्या नगदी पिकांसाठी बाजार नियोजन, थेट विक्री व्यवस्था, दर स्थिरीकरण यंत्रणा आणि प्रक्रिया उद्योगाशी जोड दिल्यास शेतकऱ्यांचा आत्मविश्वास वाढू शकतो. शासकीय स्तरावरून बाजार माहिती व मार्गदर्शन मिळाल्यास पुढील हंगामात पुन्हा टरबूज लागवड वाढण्याची शक्यता आहे.
मागील वर्षी टरबूजाला चांगला भाव मिळाला. मात्र, यंदा दराबाबत खात्री नसल्यामुळे लागवड केली नाही. पाण्याची सोय असूनही जोखीम जास्त वाटते.- संभाजी घुले, शेतकरी, तळतुंबा
हे ही वाचा सविस्तर : Rajma Cultivation : जमिनीचा पोत सुधारतोय; राजमाने दिला शेतकऱ्यांना नवा आधार
