Vela Amavasya : धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी वर्गासाठी अत्यंत जिव्हाळ्याचा मानला जाणारा वेळा अमावस्येचा सण यंदाही मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. (Vela Amavasya)
मार्गशीर्ष अमावस्येला साजरा होणारा हा सण केवळ धार्मिक विधी नसून, शेती, निसर्ग आणि माणूस यांच्यातील नात्याचा उत्सव आहे. (Vela Amavasya)
यानिमित्त गुरुवारी धाराशिव शहरातील देशपांडे स्टॅंड परिसरात पूजेसाठी लागणाऱ्या मोरवे, पूजा साहित्य आणि बारा भाज्यांच्या खरेदीसाठी शेतकऱ्यांनी मोठी गर्दी केली होती. (Vela Amavasya)
मोरव्यासह भाज्यांना मोठी मागणी
वेळा अमावस्येच्या पूजेसाठी मातीपासून बनवलेले मोरवे (मोरवे/कोपी) अनिवार्य असतात. यंदा मात्र कच्च्या मालाच्या वाढत्या किमतीमुळे मोरव्यांच्या दरात लक्षणीय वाढ झाली आहे.
गतवर्षी ४० रुपयांना मिळणारा छोटा मोरवा यंदा ६० रुपयांपासून २०० रुपयांपर्यंत विकला जात होता. मेहनतीने बनवलेल्या वस्तूंना अपेक्षित मोबदला मिळत नसल्याची खंत कुंभार बांधवांनी व्यक्त केली. तरीही काळ्या आईची ओटी भरण्याची श्रद्धा अधिक असल्याने, शेतकरी वाढीव दरानेही मोरवे खरेदी करताना दिसले.
भज्जीसाठी बारा भाज्यांची लगबग
या सणाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे सर्व भाज्यांची एकत्र भज्जी. पालक, मेथी, हरभरा, वाटाणा, वाल, वांगी, कोबी यांसह अनेक भाज्यांची खरेदी मोठ्या प्रमाणात झाली.
यामध्ये विशेषतः लसणाची पात अधिक मागणीत होती. समाधानकारक बाब म्हणजे, यंदा बहुतांश भाज्या मुबलक आणि तुलनेने स्वस्त उपलब्ध असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला.
वेळा अमावस्या : परंपरेचा अर्थ
वेळा अमावस्या हा सण मूळचा कर्नाटकातील असून, महाराष्ट्रातील धाराशिव (उस्मानाबाद), लातूर, सोलापूर व शेजारील तालुक्यांत मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.
मूळ कानडी शब्द 'येळ्ळ अमावस्या' म्हणजे पेरणीनंतर येणारी सातवी अमावस्या. कालांतराने त्याचाच अपभ्रंश होऊन वेळा अमावस्या हा शब्द रूढ झाला.
शेतातच साजरा होणारा सण
या दिवशी पहाटेच शेतकरी आपल्या कुटुंबासह शेताकडे जातात. आदल्या दिवशी कडब्यापासून तयार केलेल्या कोपीमध्ये शेतातील सर्व पिकांची, मातीपासून बनवलेल्या पांडवांची (पंचमहाभूते) पूजा केली जाते. एका रंगवलेल्या माठामध्ये आंबिल भरून ते ग्रामदेवतेस नैवेद्य दाखवून शेतात आणले जाते.
ज्वारी-बाजरीचे उंडे, आंबट भात, सर्व भाज्यांची भज्जी, खीर, आंबिल असे विविध पदार्थ शेतातच बनवून नैवेद्य व वनभोजन केले जाते. या दिवशी ज्यांना शेती नाही, अशांनाही आवर्जून शेतात जेवायला बोलावले जाते. त्यामुळे हा सण समतेचा, माणुसकीचा आणि सामूहिकतेचा संदेश देतो.
खेड्यांत उत्सव
वेळा अमावस्येला अनेक गावांत पतंग उडवण्याची परंपरा आहे, तर काही ठिकाणी संध्याकाळी ताकदीचे खेळ खेळले जातात. या दिवशी धाराशिव, लातूर येथे शहरांत जणू अघोषित संचारबंदीच असते. शहरे ओस पडतात आणि खेडी माणसांनी, हास्याने आणि आनंदाने फुलून जातात.
निसर्गाशी घट्ट नातं
इतर सणांप्रमाणे या सणात निसर्गाची हानी होत नाही; उलट माणसाला निसर्गाजवळ नेणारा हा सण आहे. हिरवागार शेतं, कापणीस आलेली तूर, परिपक्व होणारा हरभरा, वाऱ्यावर डुलणारा गहू, पाखरांना खुणावणारी ज्वारी या सगळ्या सजीव सृष्टीसमोर नतमस्तक होऊन केलेली पूजा म्हणजे शेतकरी आणि निसर्ग यांच्यातील शतकानुशतके चालत आलेली भागीदारीच दर्शवते.
वेळा अमावस्या हा सण म्हणूनच केवळ एक दिवसाचा उत्सव नसून, तो शेती, संस्कृती आणि निसर्ग यांचा त्रिवेणी संगम आहे.
