- किशोर मराठे
नंदुरबार : सद्यस्थितीत अनेक शेतकऱ्यांना पाणी (Water Crop Management) जवळपास नसल्याने बारमाही शेती करणे जमत नाही. तर काही शेतकरी काहीतरी जुगाड करून पाणी शेतीपर्यंत आणून शेती करतात. असाच काहीसा प्रयोग नंदुरबार (Nandurbar district) जिल्ह्यातील अक्कलकुवा शेतकऱ्यांनी केला आहे. शेतापासून दूरवर असलेल्या झिऱ्यावरून पाणी भाजीपाला शेती फुलवली आहे.
अक्कलकुवा तालुक्यातील व सातपुड्याच्या डोंगर माथ्यावरील ओरपाच्या वेहीबारपाडा व डाब चापडीपाडा येथील शेतकऱ्यांनी हा प्रयोग केला आहे. वाहुण जाणाऱ्या झऱ्याच्या पाण्याला डोंगर माथ्याचा चढ उतार असल्याने जवळपास दीड ते दोन किलोमीटर अंतरावरून पाणी आणले आहे. यासाठी आजूबाजूच्या चार शेतकऱ्यांची भाजीपाला शेतीला (Vegetable Farming) नवसंजीवनी दिली आहे.
या पाड्यावरील चार शेतकऱ्यांपैकी एका शेतकऱ्याकडे बोअरला कमी पाणी तर दुसऱ्या शेतकऱ्याच्या बोअरला पाणीच नसल्याची परिस्थिती आहे. याच परिसरात एक जिवंत झरा असून याचे पाणी वाहून जात असल्याचे शेतकऱ्यांच्या निदर्शनास आले. या शेतकऱ्यांनी दिड ते दोन किलोमीटर असलेल्या या झऱ्याचे वाहणारे पाणी नळीद्वारे आप आपल्या शेतात आणुन जलसाठा केला आहे.
दरम्यान पाण्याची साठवणूक चांगली असल्याने याच पाण्यात भेंडी, वांगी, टोमॅटो, काकडी, गवार, लसुण अशी भाजीपाला शेती केली आहे. शिवाय शेळीपालन देखील असल्याने शेतातच हिरवा चाऱ्याचे पीकही घेतले आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांना झिऱ्याच्या पाण्याचा चांगलाच उपयोग होत आहे.