Vanrai Bandhare : उन्हाळ्यात नाशिकच्या आदिवासी (Nashik District Trible Area) पट्ट्यात प्रचंड पाणी टंचाई असते. यामुळे महिलांना पाण्यासाठी जीवाचा आटापिटा करावा लागतो. अशावेळी काही पाण्याचे स्रोत जे बंद झाले आहेत, पण ते पुनर्जीवित करता येतील. अशी ठिकाणे किंवा जागा पाहून आदिवासी बांधव पाणी अडवून वनराई बंधारे (Vanrai Bandhare) तसेच पावसाळ्यातील पाणी जिरावे म्हणून दगडी बंधारे बांधण्याचे काम उन्हाळ्यात करतात.
साधारण मार्च महिन्यापासून आदिवासी बांधवाना पाणी टंचाईचा (Water Shortage) सामना करावा लागतो. अशावेळी जवळील नदी, नाले कोरडेठाक होऊन जातात. काही काही ठिकाणी झिऱ्याच्या रूपात थोडे थोडे पाणी दिसून येते. किंवा गाव परिसरात असलेल्या मोठ्या ओढ्याच्या जागा पाहून थोडक्यात वाहत असलेले पाणी थांबवले जाते. यासाठी गावातील अनेक नागरिक या सामूहिक कामात सहभागी होऊन वनराई बंधारे बांधतात.
वनराई बंधारे बांधण्यासाठी तेथीलच दगडांचा वापर केला जातो. शिवाय महत्वाचा घटक म्हणजे रिकाम्या सिमेंटच्या गोण्यांचा वापर यासाठी केला जातो. या सिमेंटच्या गोण्या कुठूनही उपलब्ध केल्या जातात. त्यांनतर या गोण्यांमध्ये माती किंवा दगडं भरून बांध भरला जातो. मग या गोण्यांमधून किंचितही पाणी जाऊ नये म्हणून मातीने सारवून घेतले जाते. अअशा पद्धतीने छोट्या छोट्या जागांवर असे वनराई बंधारे बांधले जातात.
वनबंधारे, दगडी बांध तयार करणे
वनराई बंधारा हा एक नैसर्गिकरित्या बांधलेला बंधारा आहे, जो सिमेंटच्या रिकाम्या पोत्यांमध्ये माती किंवा वाळू भरून बांधला जातो. हा बंधारा वनराई आणि जमिनीचे संरक्षण करण्यासाठी तसेच पाण्याचा साठा वाढवण्यासाठी उपयोगी ठरतो. वनराई बंधारा हा बंधाऱ्याच्या बांधकामाचा एक कच्चा प्रकार आहे. हा बहुदा तात्पुरता असतो. हा बंधारा वनराई संवर्धनाचे काम करतो म्हणून यास वनराई बंधारा म्हणतात.