Turmeric Research Center : हिंगोली जिल्ह्यातील बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन व प्रशिक्षण केंद्र आणि जिल्ह्याच्या दूध उत्पादनात वाढ यासाठी नियोजनबद्ध पावले उचलण्याचे आदेश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी कृषी अधिकाऱ्यांना दिले आहेत. (Turmeric Research Center)
जिल्ह्यातील बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन व प्रशिक्षण केंद्र उभारणीसाठीची कामे गतीने पुढे न्यावीत आणि या केंद्रासाठी लागणारे मनुष्यबळ, साधनसामुग्री, यंत्रसामुग्री तसेच बेणेसाठी जागा यासाठी पुढील पाच वर्षांचे ठोस नियोजन तयार करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी कृषी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.(Turmeric Research Center)
शुक्रवारी (४ जुलै) रोजी आयोजित कृषी विभागाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. या वेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र कदम, जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी अतुल वायसे, उपविभागीय कृषी अधिकारी प्रदीप कच्छवे, सर्व तालुका कृषी अधिकारी, विमा प्रतिनिधी आणि विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.(Turmeric Research Center)
६५ एकरात उभा राहणार हळद संशोधन केंद्र
हळद संशोधन व प्रशिक्षण केंद्रासाठी ६५ एकर जागा आधीच उपलब्ध असून, त्याठिकाणी संरक्षक भिंतीचे काम पूर्ण झाले आहे. केंद्रासाठी ७५ अधिकारी व कर्मचारी तसेच ५० कंत्राटी कर्मचाऱ्यांचा आकृतिबंध तयार असून, त्याला मान्यता घेण्याची कार्यवाही सुरू आहे. सध्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांमधून १० पदे कंत्राटी तत्वावर भरली गेली आहेत.
२०३० पर्यंतचा आराखडा सादर करण्याचे आदेश
केंद्रासाठी लागणारी साधनसामुग्री, बेणेसाठी जागा, यंत्रसामुग्रीची क्षमता, हळदीच्या वाणांचे महत्त्व, शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्याची यंत्रणा अशा सर्व बाबींसह २०३० पर्यंतचा सविस्तर आराखडा तयार करण्याचे आदेशही गुप्ता यांनी यावेळी दिले.
जिल्ह्यात दूध उत्पादन वाढीसाठीही नियोजन करा
यावेळी बोलताना जिल्हाधिकारी गुप्ता यांनी जिल्ह्यातील दूध उत्पादन वाढीसाठी योजनाबद्ध पद्धतीने प्रयत्न करण्याचेही निर्देश दिले. यासाठी जिल्ह्यातील दूध संकलन केंद्रांची संख्या, विद्यमान पशुधन, जिल्ह्याला दररोज लागणारे दूध याचा तपशील गोळा करून सविस्तर योजना सादर करण्याचे सांगितले. तसेच दुधाचे उत्पादन वाढवण्यासाठी कोणकोणते उपक्रम राबविले जाऊ शकतात, याचाही आढावा घ्यावा, असेही त्यांनी स्पष्ट केले.
कृषी विभागाच्या योजनांचा आढावा
बैठकीत जिल्ह्यात कृषी विभागाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा आढावाही घेण्यात आला. या योजनांची अंमलबजावणी प्रभावीपणे व्हावी यासाठी अधिकारी आणि कर्मचारी यांनी ठरावीक वेळेत काम पूर्ण करण्याचेही गुप्ता यांनी सांगितले.