Tur Harvest Delay : गेल्या काही दिवसांपासून थंडीचा जोर लक्षणीय वाढला असून, त्याचा थेट परिणाम खरीप हंगामातील तूर पिकावर होताना दिसत आहे. (Tur Harvest Delay)
तापमानात झालेल्या तीव्र घसरणीमुळे तुरीची वाढ मंदावली असून, शेंगा भरण्याची प्रक्रिया संथ झाली आहे. परिणामी, यंदा तुरीची काढणी अपेक्षेपेक्षा उशिरा होण्याची शक्यता असून, तूर हंगाम लांबण्याचा अंदाज कृषी तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. (Tur Harvest Delay)
याचा थेट फटका पुढील रब्बी हंगामाच्या नियोजनावर बसण्याची शक्यता असल्याने शेतकरी वर्ग चिंतेत आहे.(Tur Harvest Delay)
सामान्यतः डिसेंबर महिन्याच्या मध्यापासून तुरीची काढणी सुरू होते. मात्र, यंदा रात्रीचे तापमान सातत्याने कमी राहिल्यामुळे पिकाची नैसर्गिक वाढ खुंटल्याचे अनेक भागांत दिसून येत आहे. (Tur Harvest Delay)
काही शेतांमध्ये तुरीच्या शेंगा अद्याप पूर्णपणे भरलेल्या नाहीत, तर काही ठिकाणी फुलधारणा अजूनही सुरू असल्याचे चित्र आहे. यामुळे काढणीसाठी लागणारा कालावधी वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.(Tur Harvest Delay)
रब्बी पिकांचे नियोजन बिघडण्याची भीती
तुरीची काढणी उशिरा झाल्यास त्याचा मोठा परिणाम रब्बी हंगामातील गहू, हरभरा आणि ज्वारी यांसारख्या पिकांवर होणार आहे. अनेक शेतकरी तूर काढल्यानंतर तत्काळ रब्बी पिकांची पेरणी करतात.
मात्र, तूर उशिरा निघाल्यास रब्बी पेरणीस विलंब होऊन उत्पादनावर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पुढील हंगामाचे नियोजन विस्कळीत होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
तुरीवर रोगराई आणि किडींचा धोका
कृषी विभागाच्या माहितीनुसार, वाढत्या थंडीमुळे तुरीवर करपा रोग तसेच शेंगा पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे.
पीक अधिक काळ शेतात राहिल्यास रोगराई आणि किडींचा धोका वाढून उत्पादनात नुकसान होऊ शकते. त्यामुळे शेतकऱ्यांनी नियमित पाहणी करून योग्य वेळी संरक्षणात्मक उपाययोजना कराव्यात, असे आवाहन कृषी तज्ज्ञांकडून करण्यात येत आहे.
मजुरी खर्च वाढण्याची शक्यता
तूर हंगाम लांबल्यास आधीच असलेली मजुरांची टंचाई आणि वाढलेले मजुरी दर यामुळे शेतकऱ्यांवरील आर्थिक भार वाढण्याची शक्यता आहे. काढणीस उशीर झाल्यास मजुरांची उपलब्धता आणि खर्च यांचा ताण अधिक जाणवू शकतो, अशीही शक्यता व्यक्त केली जात आहे.
हवामान लक्षात घेऊन नियोजनाची गरज
हवामानातील बदल लक्षात घेता पुढील पीक नियोजन करताना अधिक काळजी घेण्याची गरज असल्याचे मत कृषी तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
सध्याच्या परिस्थितीत पिकांचे योग्य व्यवस्थापन, रोग-किड नियंत्रण आणि हवामान अंदाजावर आधारित निर्णय घेणे शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे ठरणार आहे.
