Tur Crop : संग्रामपूर तालुक्यात यंदा तूर पिकाच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणावर घट झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. अनेक शेतकऱ्यांना एकरी अवघे दोन ते अडीच क्विंटलपर्यंतच उत्पादन मिळाल्याने तुरीच्या पिकावर झालेला खर्चही निघत नसल्याची गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.(Tur Crop)
तालुक्यातील बोरखेड, सोनाळा, सगोडा आणि दानापूर शिवारात गेल्या तीन वर्षांपासून कपाशी पिकावर सातत्याने बोंडअळीचा प्रादुर्भाव होत असल्याने यंदा सुमारे ७० टक्के शेतकऱ्यांनी कपाशीऐवजी सोयाबीन व तूर पिकाचा पेरा वाढवला होता. (Tur Crop)
काही बागायतदार शेतकऱ्यांनी बेड पद्धतीने मे महिन्याच्या अखेरीस तुरीची लागवड केली, तर काही शेतकऱ्यांनी सोयाबीनमध्ये एकेरी तास पद्धतीने जून अखेरीस तुरीची पेरणी केली होती.(Tur Crop)
पेरणीच्या काळात पावसाचे प्रमाण समाधानकारक असल्याने सुरुवातीला तूर पीक जोमात वाढले. त्यामुळे शेतकऱ्यांना चांगल्या उत्पादनाची अपेक्षा होती. मात्र, नोव्हेंबर महिन्यात अचानक रोगाचा प्रादुर्भाव वाढल्याने शेंगा व्यवस्थित भरल्या नाहीत. परिणामी, उत्पादनावर थेट परिणाम झाला असून अनेक शेतकऱ्यांचे तूर पीक अक्षरशः फसले आहे.
सध्या बोरखेड परिसरात मळणी यंत्राद्वारे तुरीची काढणी सुरू असून उत्पादन अत्यल्प असल्याचे चित्र स्पष्टपणे दिसून येत आहे.
एक एकरातील संपूर्ण तूर पीक घरात येईपर्यंत शेतकऱ्यांना साधारण १५ हजार रुपयांपर्यंत खर्च येतो. यामध्ये बियाणे, खत, औषध फवारणी, मजुरी आणि काढणीचा खर्च समाविष्ट आहे.
सध्या बाजारात चांगल्या दर्जाची तूर व्यापाऱ्यांकडून सुमारे ७ हजार २०० रुपये प्रति क्विंटल दराने खरेदी केली जात आहे. मात्र, उत्पादन कमी असल्याने अपेक्षित उत्पन्न मिळत नसून अनेक शेतकऱ्यांना तोट्याचा सामना करावा लागत आहे. ओलसरपणा असल्यास दरात आणखी कपात होत असल्याने शेतकऱ्यांची अडचण वाढली आहे.
बोरखेड येथील शेतकरी ज्ञानदेव बारब्दे यांनी सांगितले की, “माझ्या शेतात एक एकरात अवघी दोन क्विंटल तूर झाली. तुरीमध्ये ओलसरपणा असल्याने साडेसहा हजार रुपये प्रति क्विंटल दरानेच विक्री करावी लागली. त्यामुळे पिकावर झालेला खर्चही निघाला नाही.”
उत्पादनातील घट, वाढता शेती खर्च आणि अपेक्षित दर न मिळाल्यामुळे संग्रामपूर तालुक्यातील तूर उत्पादक शेतकरी मोठ्या चिंतेत आहेत. शासनाने तूर पिकाच्या नुकसानीची पाहणी करून योग्य तो दिलासा द्यावा, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.
तुरीचा उतारा
एकरी सरासरी उतारा : २ ते २.५ क्विंटल
काही शेतांमध्ये : २ क्विंटलपेक्षाही कमी उतारा
कमी उताऱ्याची प्रमुख कारणे
* नोव्हेंबरमध्ये अचानक रोगाचा प्रादुर्भाव
* शेंगा न भरणे
* हवामानातील चढ-उतार
* पेरणी चांगली झाली तरी नंतर पोषक वातावरण मिळाले नाही
खर्च किती झाला?
एकरी खर्च : सुमारे १५,००० रुपये
सध्याचा बाजारभाव : ६,५०० ते ७,२०० रुपये प्रति क्विंटल
उतारा कमी असल्याने खर्चही निघत नाही, असा शेतकऱ्यांचा अनुभव
हे ही वाचा सविस्तर : Tur Market : तुरीची आवक दुप्पट; हमीभाव मिळतोय काय? वाचा सविस्तर
