Token Technology : जास्त उत्पादन… तेही कमी खर्चात. एकरी फक्त १ किलो बियाणं वापरून तुरीची पेरणी करून या शेतकऱ्याने दाखवली शेतीतील नवी दिशा.
पारंपरिक पद्धतीला फाटा देत शिरूर अनंतपाळ येथील शिवप्रसाद वलांडे यांनी टोकन पद्धतीने तूर व सोयाबीनची लागवड करून खर्चात मोठी बचत केली. त्यांचा हा प्रयोग आज अनेक शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. (Token Technology)
सध्याच्या महागाईच्या काळात शेतमालाचे उत्पादन टिकवून ठेवणे आणि लागवडीचा खर्च कमी करणे हे शेतकऱ्यांसमोर मोठे आव्हान आहे. परंतु पारंपरिक शेती पद्धतीला बाजूला ठेवून शिरूर अनंतपाळ येथील सेवानिवृत्त कृषी अधिकारी शिवप्रसाद वलांडे यांनी 'टोकन पद्धती'चा वापर करून सहा एकर शेतीवर तुरीची आणि सोयाबीनची अद्वितीय पद्धतीने लागवड केली आहे.(Token Technology)
पारंपरिक पीक पद्धतीला फाटा देत येथील एका शेतकऱ्याने खरिपातील सोयाबीन आणि तुरीची आधुनिक टोकन पद्धतीने लागवड केली आहे. त्यामुळे बियाणे, खत, लागवडीचा खर्च कमी झाला आहे.(Token Technology)
येथील सेवानिवृत्त कृषी अधिकारी शिवप्रसाद वलांडे यानी आपल्या शेतीत सहा एकरावर अत्याधुनिक टोकन तंत्रज्ञान पद्धत वापरून सोयाबीन तसेच तुरीची लागवड केली आहे. सहा एकरवर उसाची लागवडीसाठी ज्या पद्धतीच्या सऱ्या तयार केल्या जातात, त्या पद्धतीच्या सऱ्या तयार करून तीन फूट अंतरावर टोकन यंत्राच्या साह्याने सोयाबीन तसेच दीड फूट अंतरावर तुरीची लागवड केली आहे.(Token Technology)
एक आड एक सरीवर तुरीची लागवड
तुरीची लागवड करण्यासाठी शेतकरी शिवप्रसाद वलांडे यांनी एक आड- एक सरीचा वापर करून त्यावर तुरीची टोकन पद्धतीने लागवड केली आहे. त्यामुळे त्यांच्या लागवड खर्चात मोठी बचत झाली असल्याने त्यांच्या लागवड पद्धतीची पाहणी करून अनेक शेतकरी अनुकरण करीत आहेत. शिरुर अनंतपाळ येथील शेतकरी शिवप्रसाद वलांडे हे शेतात नवनवीन प्रयोग करीत असतात.
एकरी एक किलो तुरीचे बियाणे
एक आड एक सरी पद्धतीचा वापर करून सरीच्या मध्यभागी टोकन पद्धतीने दीड फूट अंतरावर तुरीच्या केवळ दोन बियांचा वापर केल्यामुळे एकरी एक किलो तुरीच्या बियाणांचा वापर झाला आहे. बियाणांचा तसेच लागवडीचा खर्च मोठ्या प्रमाणात कमी झाल्याचे वलांडे यांनी सांगितले.
सरीवर तूर आणि बाजूने सोयाबीन
तुरीच्या पिकाला सुरुवातीच्या काळात कमी पाणी लागते. त्यामुळे तुरीची लागवड एक आड एक सरीच्या मध्यभागी करण्यात आली असून, सरीच्या बाजूने सोयाबीनची टोकन यंत्राच्या साह्याने लागवड केली आहे. त्यामुळे सोयाबीन आणि तूर यांच्यात योग्य अंतर ठेवल्यामुळे दोन्हीच्या भरघोस वाढीसाठी मदत होते.
खर्च कमी अन् उत्पादनाची हमी
खरिपातील सोयाबीन आणि तूर लागवडीवर होणाऱ्या खर्चाची मोठ्या प्रमाणात बचत झाली आहे. महागाईच्या काळात लागवड खर्च कमी हेच भरघोस उत्पादनाच्या हमीचे सूत्र असल्याचे शिवप्रसाद वलांडे यांनी सांगितले.