बी. व्ही. चव्हाण
उमरी तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी नगदी पीक ठरलेली तंबाखू शेती सध्या मोठ्या संकटात सापडली आहे. गतवर्षी तंबाखू खरेदीसाठी आलेल्या व्यापाऱ्यांनी ऐनवेळी पाठ फिरवल्याने शेतकऱ्यांची मोठी आर्थिक कोंडी झाली.(Tobacco Farming Crisis)
याच पार्श्वभूमीवर यंदा तालुक्यात तंबाखूची लागवड तब्बल एक हजार एकरांवरून थेट अवघ्या पन्नास एकरांपर्यंत घटली आहे. परिणामी शेतकऱ्यांचे उत्पन्नाचे महत्त्वाचे साधन हरपले असून, या शेतीवर अवलंबून असलेल्या मजुरांचा रोजगारही बुडाला आहे.(Tobacco Farming Crisis)
गेल्या काही वर्षांत उमरी तालुक्यात तंबाखूची लागवड मोठ्या प्रमाणात वाढली होती. पोषक हवामान, पुरेसा पाऊस आणि स्वस्तात उपलब्ध होणारा मजूरवर्ग यामुळे तंबाखू उत्पादनात भरघोस वाढ झाली होती.(Tobacco Farming Crisis)
गतवर्षी तळेगाव, चिंचाळा, नागठाणा, बळेगाव, बेलदरा, हातनी, महाटी, इज्जतगाव, कौडगाव, अब्दुल्लापूरवाडी, मनूर आदी गावांमध्ये मोठ्या प्रमाणात तंबाखूची शेती करण्यात आली होती. जवळपास एक हजार एकर क्षेत्रावर तंबाखूचे पीक घेतले गेले होते आणि उत्पादनही चांगले झाले होते.(Tobacco Farming Crisis)
चांगल्या भावाची अपेक्षा फोल
दोन वर्षांपूर्वी तंबाखूला चांगला बाजारभाव मिळाल्याचा अनुभव असल्याने शेतकऱ्यांना यंदाही समाधानकारक दर मिळेल, अशी अपेक्षा होती.
नजीकच्या तेलंगणा व आंध्र प्रदेशातील व्यापारी दरवर्षी तंबाखू पानांची खरेदी करत असल्याने शेतकऱ्यांचा आत्मविश्वास वाढला होता. मात्र, यावेळी खरेदीदारांनी शेवटच्या टप्प्यावर अचानक पाठ फिरवली. परिणामी शेतकऱ्यांना तंबाखू विक्रीसाठी वशिला लावावा लागला.
दरात मोठी घसरण, कोट्यवधींचा फटका
१३ हजार रुपये प्रतिक्विंटल दर मिळणारा तंबाखू अवघ्या ६ ते ८ हजार रुपयांमध्ये विकावा लागल्याने शेतकऱ्यांना कोट्यवधी रुपयांचा आर्थिक फटका बसला. अनेक शेतकऱ्यांकडे अजूनही गतवर्षीचा तंबाखू साठा पडून आहे. यंदाच्या अतिवृष्टीमुळे इतर पिकांचेही नुकसान झाले असल्याने शेतकरी दुहेरी संकटात सापडले आहेत.
लागवड घटली, रोजगारावर परिणाम
या सर्व परिस्थितीचा थेट परिणाम यंदाच्या लागवडीवर झाला असून तालुक्यात केवळ ५० एकर क्षेत्रावरच तंबाखूची लागवड करण्यात आली आहे. त्यामुळे तंबाखू शेतीवर अवलंबून असलेले शेकडो मजूर बेरोजगार झाले आहेत. शेतकरी आणि मजुरांच्या हाताला काम न मिळाल्याने ग्रामीण अर्थव्यवस्थेवरही याचे विपरीत परिणाम जाणवत आहेत.
शेतकऱ्यांची मागणी
तंबाखू उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांनी योग्य बाजारभाव मिळावा यासाठी व्यापारी व उद्योजकांनी पुढे यावे, अशी मागणी केली आहे. इतर राज्यांत तंबाखू शेतीला चांगला प्रतिसाद मिळत असताना, उमरी तालुक्यातील शेतकरी मात्र अडचणीत सापडले आहेत.
उमरी तालुक्यात तंबाखू उत्पादनाची मोठी क्षमता आहे. योग्य भाव मिळाल्यास शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फायदा होऊ शकतो.- बालाजी शिगळे, तळेगाव
बहुतांश शेतकऱ्यांकडे गतवर्षीचा तंबाखू साठा आहे. अतिवृष्टीमुळे यंदा नुकसान झाले असून त्याची भरपाई देण्यासाठी शासनाने लक्ष द्यावे.- जनार्दन शिंदे, बळेगाव
तंबाखू शेती अडचणीत आल्याने उमरी तालुक्यातील शेतकरी वर्ग सध्या मोठ्या चिंतेत असून, शासन व बाजार यंत्रणेकडून ठोस उपाययोजनांची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
