नंदुरबार : वर्षभरापासून रखडलेले शेतकऱ्यांचे ठिबक सिंचन योजनेचे (Tibak Anudan) अनुदान शासनाने वितरित केले असून, तळोदा तालुक्यातील ११९ शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वेट रक्कम जमा झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. तथापि सदर अनुदान नियमित देण्याची अपेक्षाही शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
गेल्या अनेक वर्षापासून शासन ठिबक सिंचन योजना (Tibak Sinchan Yojana) राबवित आहे. तळोदा तालुक्यातही सिंचन योजनांसाठी तालुका कृषी कार्यालयाकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार सन २०२३ -२०२४ मध्ये शासनाच्या कृषी विभागाकडे साधारण २५२ शेतकऱ्यांनी प्रस्ताव दाखल केले होते. सदर प्रस्तावांची प्रत्यक्ष बांधावर जाऊन चौकशी करत कागदपत्रांची पूर्तता करून शासनाकडे पुढील कार्यवाहीकरिता पाठविले होते.
एक कोटी दहा लाख रुपयांचे अनुदान जमा
तळोदा तालुक्यातील शेतकऱ्यांचे ठिबक सिंचन योजनेचे एक कोटी नऊ लाख ५८ हजार रुपयांचे अनुदान शासनाने मंजूर केले आहेत. त्यापैकी ११९ शेतक-यांच्या बँक खात्यात थेट रक्कम देखील जमा झाल्याची माहिती देण्यात आली आहे. उर्वरित शेतकऱ्यांचे अनुदानही लवकरच जमा होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
वर्षभरापासून अनुदानाची प्रतीक्षा लागून होती
शासनाने १५२ शेतकऱ्यांचे प्रस्ताव मंजूर करून त्यांना अनुदानासाठी पात्र ठरविले होते. मात्र, निधीअभावी शेतकऱ्यांना गेल्या वर्षभरापासून अनुदानाची प्रतीक्षा लागून होती. अखेर शासनाकडे निधी उपलब्ध झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या बैंक खात्यावर थेट रक्कम जमा करण्यात आली आहे. त्यामुळे शेतकन्यांनी समाधान व्यक्त केले आहे.
उर्वरित शेतकऱ्यांना अनुदानाची प्रतीक्षा
शासनाने २५२ शेतकऱ्यांपैकी ११९ शेतकऱ्यांचे ठिबक सिंचन योजनेचे अनुदान अदा केले असले तरी अजूनही उर्वरित शेतकऱ्यांना अनुदान प्राप्त न झाल्याने त्यांना प्रतीक्षा लागून आहे. त्यामुळे त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून, त्यांनाही शासनाने लवकर अनुदान देण्याची मागणी त्यांनी केली आहे.
तळोदा तालुक्यातील ११९ शेतकऱ्यांच्या खात्यात डीबीटीच्या माध्यमातून सिंचन योजनेचे अनुदान जमा झाले असून, उर्वरित शेतकऱ्यांचे अनुदानही लवकरच जमा होणार आहे. ज्या शेतकऱ्यांनी अनुदानासाठी अर्ज केला आहे त्यांनी आपल्या बँक खात्याची माहिती वेळोवेळी तपासावी. काही अडचण असल्यास तालुका कृषी कार्यालयाकडे संपर्क करावा.
- मीनाक्षी वळवी, कृषी अधिकारी, पंचायत समिती तळोदा