श्यामकुमार पुरे/ सोपान कोठाळे
सिल्लोड तालुक्यातील केळगाव परिसरात झालेल्या अतिवृष्टीने जनजीवन विस्कळीत झाले आहे. गेल्या महिन्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे तालुक्यात सुमारे ८० हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले, हजारो एकर जमीन खरहून गेली. या आपत्तीचा सर्वाधिक फटका बसला तो केळगावच्या शेतकरी रामकला शिवाजी कोल्हे यांना.
“साहेब, सर्व होत्याचं नव्हतं झालं. पिकं वाहून गेली, शेती खरडून गेली. डोक्यावर पाच लाखांचं कर्ज, घरात खायला अन्नही नाही. आता दिवाळी काय साजरी करू?” अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी रामकलाबाई सांगतात.
२०१६ मध्ये कर्जबाजारीपणाला कंटाळून त्यांच्या पतीने आत्महत्या केली. तेव्हापासून दोन लहान मुलांचं संगोपन आणि शिक्षणाची जबाबदारी रामकलाबाईंच्या खांद्यावर आहे.
यंदा त्यांनी मका आणि कापूस अशी खरीप पिकं घेतली होती; मात्र अतिवृष्टीमुळे सर्व स्वप्नं वाहून गेली. सुमारे दोन एकर शेती खरडून गेल्याने लाखोंचा तोटा झाला आहे.
त्यांच्या डोक्यावर सोसायटी व ग्रामीण बँकेचे मिळून एक लाख रुपयांचे कर्ज आहे, तर विहीर खोदण्यासाठी घेतलेल्या खासगी कर्जाची रक्कम चार लाखांपर्यंत पोहोचली आहे.
“शासनाने तरी आता मदतीचा हात द्यावा. कर्जमाफी मिळावी, मुलांना दिवाळीत कपडे-गोडधोड द्यायचे स्वप्न पूर्ण करायचं आहे... अन्यथा आत्महत्येशिवाय पर्याय नाही,” असे म्हणत त्या पुन्हा डोळे पुसतात.
केळगावसह संपूर्ण सिल्लोड तालुक्यातील शेतकरी या आपत्तीने हतबल झाले आहेत. रामकलाबाईंचं दु:ख हे त्या हजारो शेतकऱ्यांचं प्रतिबिंब आहे, जे आजही पावसाने उद्ध्वस्त झालेल्या शेतीकडे असहायपणे पाहत आहेत.