Join us
Daily Top 2Weekly Top 5

बदलत्या हवामानाने पानमळा कोमेजला; शेतकऱ्यांच्या डोळ्यांत आता फक्त चिंता!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2026 13:34 IST

बदलत्या हवामानाचा मोठा फटका आता पान उत्पादक शेतकऱ्यांना बसू लागला आहे. जालना जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्यातील भारज परिसरातील एकेकाळी बहरलेले पानमळे आज कोमेजताना दिसत आहेत.

गणेश गुप्ता 

एकेकाळी हिरव्यागार पानमळ्यांसाठी प्रसिद्ध असलेला जाफराबाद तालुक्यातील भारज परिसर आज मोठ्या संकटाला सामोरा जात आहे. 

पूजा-अर्चा, सण-समारंभ आणि जेवणानंतरच्या विड्यासाठी प्रसिद्ध असलेली येथील गावरान पानं आता बाजारपेठेत टिकून राहण्यासाठी झुंज देताना दिसत आहेत. 

कमी पाऊस, अवकाळी पाऊस, गारपीट, वाढता उत्पादन खर्च आणि घटती मागणी यामुळे पान उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. अनेकांनी तर सततच्या तोट्यामुळे आपले पानमळे मोडीत काढण्यास सुरुवात केली आहे.

एकेकाळी लाखोंचे उत्पन्न; आता खर्चही निघेना

भारज परिसरातील पानमळ्यांमधील पानं भुसावळ, नागपूर, खामगाव, शेगाव यांसारख्या प्रमुख बाजारपेठांमध्ये विक्रीसाठी पाठवली जातात. 

गावातील आठ ते दहा शेतकरी एकत्र येऊन वाहनांद्वारे पानांची वाहतूक करतात. काही वर्षांपूर्वी एका एकर पानमळ्यातून दीड ते दोन लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळत होते. 

मात्र, सध्याची परिस्थिती पूर्णपणे बदलली असून हेच उत्पन्न आता अवघ्या ५० ते ६० हजार रुपयांपर्यंत घसरले आहे.

शेतकऱ्यांच्या मते, वाढत्या खर्चामुळे आणि घटलेल्या बाजारभावामुळे पान व्यवसायात आर्थिक गणित कोलमडले आहे.

पानमळा म्हणजे सतत देखभालीची कसरत

पानमळा टिकवण्यासाठी सातत्याने मेहनत घ्यावी लागते. वेल बांधणी, पानं खुडणे, पाणी व्यवस्थापन, रोगनियंत्रण यासाठी कायम मजूर ठेवावे लागतात. 

एका पानमळ्यासाठी किमान एक महिला आणि दोन पुरुष मजूर कायमस्वरूपी लागतात. मात्र गेल्या काही वर्षांत मजुरीचे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहेत.

त्यातच खत, औषधे, बांधकाम साहित्य आणि वाहतूक खर्च वाढल्याने पानमळ्याचा खर्च प्रचंड वाढला आहे. 

दुसरीकडे बाजारात अपेक्षित दर मिळत नसल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत आले आहेत.

अवकाळी पावसाचा मोठा फटका

पान हे अत्यंत संवेदनशील पीक मानले जाते. वेळेवर पाऊस न पडणे, उष्णतेत वाढ होणे किंवा अचानक अवकाळी पाऊस व गारपीट होणे याचा थेट परिणाम उत्पादनावर होतो. 

यंदा हवामानातील सततच्या बदलांमुळे अनेक पानमळ्यांमधील उत्पादन घटले आहे.

काही ठिकाणी अवकाळी पावसामुळे पाने खराब झाली, तर काही भागांत पाण्याअभावी वेली कोमेजल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे दुहेरी नुकसान होत आहे.

बनारसी आणि कोलकाता पानांचे वाढते आव्हान

स्थानिक गावरान पानांसमोर आता बनारसी आणि कोलकाता पानांचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. 

आकर्षक आकार, जास्त टिकाऊपणा आणि व्यापाऱ्यांची पसंती यामुळे बाजारात या पानांची मागणी वाढत आहे.

त्यामुळे भारज परिसरातील पारंपरिक गावरान पानांना अपेक्षित भाव मिळत नसल्याची खंत उत्पादक व्यक्त करत आहेत. पिढ्यानपिढ्या जपलेला हा व्यवसाय आता टिकवायचा की बंद करायचा, असा प्रश्न अनेक शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे.

'पूर्वी पानमळ्यावर घर चालायचं, आता खर्चही निघत नाही'

पूर्वी पानमळ्यावर संपूर्ण घर चालायचं. आता परिस्थिती इतकी बदलली आहे की खर्चही निघत नाही. पाऊस वेळेवर पडत नाही, अवकाळी पावसाने पाने खराब होतात, मजुरी वाढली आहे आणि बाजारात भाव कमी मिळतो. अशा परिस्थितीत पानमळा टिकविणे दिवसेंदिवस कठीण होत आहे. - हरिभाऊ बोडखे, पान उत्पादक शेतकरी

पारंपरिक व्यवसाय अस्तित्वाच्या संकटात

भारज परिसरातील पानमळे हे केवळ उत्पन्नाचे साधन नव्हते, तर गावाच्या ओळखीचा एक भाग होते. मात्र बदलते हवामान, वाढती स्पर्धा आणि आर्थिक असमतोल यामुळे हा पारंपरिक व्यवसाय आता अस्तित्वाच्या संकटात सापडला आहे. 

शासनाने पान उत्पादकांसाठी विशेष मदत, बाजारपेठ आणि अनुदानाची व्यवस्था केली नाही, तर भविष्यात हे पानमळे केवळ आठवणीत उरण्याची भीती व्यक्त होत आहे.

हे ही वाचा सविस्तर : Agriculture News : तंत्रज्ञानामुळे शेती 'स्मार्ट'; तरी शेतमजुरांशिवाय शेती अजूनही अपुरीच!

अधिक वाचा : Cotton Market : पांढरे सोने चमकले; मानवत बाजारात दराचा नवा विक्रम

 

English
हिंदी सारांश
Web Title : Betel leaf farms wither; Jalna farmers face economic hardship.

Web Summary : Jalna's betel leaf farmers struggle with low rainfall, rising costs, and falling demand. Many have abandoned their farms due to losses. Local leaves face competition from Banarasi and Kolkata varieties, threatening a generations-old tradition.
टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीशेती